Angar Nagar Panchayat: अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज प्रस्तावक (सूचक) यांच्या स्वाक्षरीच्या अभावामुळे तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थिटे यांनी हा राजकीय कट असल्याचा आरोप केला असून, त्यांचा मुलगा सोबत असताना सही कशी राहिली, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला थिटे या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरवला आहे. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळे राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय निश्चित झाला.
उज्ज्वला थिटे न्यायालयात दाद मागणार
अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनी आवश्यक कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती, या मुद्द्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नव्हती, आणि नियमानुसार हा अर्ज अवैध ठरल्यामुळे तो बाद करण्यात आला. उज्ज्वला थिटे यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून न्यायावर विश्वास व्यक्त करत न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
सूचकाची सही राहिलीच कशी?
त्यांनी असा आरोप केला की, अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी चार ते पाच दिवस संघर्ष केला आणि अर्ज भरण्यापूर्वी कागदपत्रे वकिलाकडून तपासून घेतली होती. थिटे यांनी जोरदार आक्षेप घेतला की अर्ज दाखल करताना त्यांचा मुलगा सूचक म्हणून त्यांच्यासोबत होता आणि प्रत्येक कागदपत्रावर मुलाची सही होती. त्यामुळे "सूचकाची सही राहिलीच कशी? हे शक्यच नाही," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. थिटे यांनी आरोप केला आहे की त्यांच्या प्रतिस्पर्धकांनी राजकीय कट करून अर्ज बाद केला आहे. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील आणि प्रशासनावर आरोप केले. उमेश पाटील यांनी दावा केला की, उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचक म्हणून त्यांच्या मुलाची सही होती आणि ती निवडणूक अधिकाऱ्यांसमोर केली होती. त्यांनी मागणी केली की, प्रशासनाने काही 'टेक्निक' वापरून सही गायब केली का? याची चौकशी व्हायला हवी.
राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली
त्यांनी पूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर आरोप केला होता की, उमेदवारी अर्ज भरता येऊ नये म्हणून राजन पाटील यांनी गुंडांची फौज उभी केली आणि संपूर्ण यंत्रणाही कामाला लावली होती. यामुळे त्यांना सोमवारी पहाटे 5 वाजता पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला होता. ही निवडणूक मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, कारण त्यांचे अनगर ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे.
इतर महत्वाच्या बातम्या