सोलापूर : शरद पवार (Sharad Pawar) यांचा दौरा पुढे ढकलल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde)  यांनी देखील नियोजित बैठकीला जाण्याचे टाळले आहे. पंढरपूर (Pandharpur) येथे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत  महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक होणार होती. शरद पवारांचा अचानक दौरा रद्द झाल्याने सुशील कुमार शिंदेनी हा निर्णय घेतला आहे. 


राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पंढरपूर येथे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक होणार होती. "शरद पवार यांचा दौरा का पुढे ढकलला याची मला माहिती नाही, पण ही बैठक एकत्रित होती त्यामुळे जर ते नसतील तर मी देखील जाणार नाही," असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 


 सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात होता. मात्र मागील काही निवडणुकांपासून हे मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेले आहेत.  2009 च्या निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तर सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे.आपल्या हक्काचे मतदारसंघ गेल्याने  या दोन्ही नेत्यांनी माढा आणि सोलापूर मतदारसंघाकडे आपले लक्ष केंद्रित केले होते. त्याच अनुषंगाने आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शरद पवार यांचा दौरा अचानक पुढे ढकलल्याने सुशील कुमार शिंदे यांनी देखील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली  आहे. 


महाविकास आघाडीची आजची बैठक का महत्त्वाची?


सोलापूर लोकसभा हा काँग्रेसचा मतदारसंघ असून यंदा येथून आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु आहे. तर माढा हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्याने येथील उमेदवारीबाबत चाचपणी होणार आहे. सध्या हे दोन्ही मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून माढ्यातील शरद पवार यांचे  सहकारी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत चाचपणी होणार होती.   माढा विधानसभेचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे , करमाळा विधानसभेचे आमदार संजयामामा शिंदे हे दोन्ही बंधू अजित पवार गटात असून फलटणचे रामराजे निंबाळकर , माळशिरसाचे उत्तम जानकर यांनीही अजित पवार याना साथ दिल्याने सध्या शरद पवार यांच्याकडे लोकसभेसाठी उमेदवार नाही . यातच माढा लोकसभेसाठी शिवसेनेकडून धनगर नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नावाची चर्चा सुरु असून या मतदारसंघात जवळपास सहा लाख एवढ्या संख्येने धनगर समाज असल्याने ही जागा शिवसेनेला देण्याबाबत शिवसेना आग्रही आहे .  त्यामुळे आजच्या बैठकीत सोलापूर आणि माढा लोकसभेबाबत गांभीर्याने विचार होणार होता. 


हे ही वाचा : 


Sharad Pawar: शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द, कारण अद्याप अस्पष्ट