Babasaheb Patil : अर्थमंत्री पद हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असून ते दादांकडेच होते आणि आता ते पुन्हा आमच्याच पक्षाला मिळेल, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे रीतसर मागणी ही करण्यात आली असल्याचे मत मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात पार्थ अजित पवार यांना मंत्रिपद देण्याची मागणी पक्षाच्या उपाध्यक्षाकडून केली असल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे, यात गैर काय आहे. ते तरुण आहेत होतकरु आहेत. घरात राजकारणाचा वारसा आहे, त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास पक्षाची ताकद वाढेल असे सूचक वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
ज्या जिल्हा बँकेच्या मुदत संपलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी निवडणुका होणार
ज्या जिल्हा बँकेच्या मुदत संपलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी निवडणुका होणार असून सोलापूर जिल्ह्यातही जिल्हा बँकेची निवडणूक होईल असे सांगत जिल्हा बँका मजबूत करण्याची तयारी आमची सुरू झाल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. केंद्रात अमित भाई शहा यांच्याकडे सहकार खाते असून सहकार मजबुतीकरण झालेले दिसेल असेही त्यांनी सांगितले.
सध्या पाऊस लांबल्याने चांगला पाऊस पडू दे असं साकडे विठ्ठलाला घातले
आज मी फलटणला माऊलींच्या पालखीचे दर्शन घेऊन विठ्ठल दर्शनासाठी आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्यावर मोजक्या लोकांसमवेतच प्रोटोकॉल नुसार दर्शन घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मोजके दोन-तीन लोकं घेऊनच मी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सध्या पाऊस लांबल्याने चांगला पाऊस पडू दे असं साकडे विठ्ठलाला घातल्याचेही बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हीआयपी दर्शना बाबत घेतलेली भूमिका योग्यच असून आम्ही कायदे करणाऱ्या लोकांनी जर नियम मोडले तर कसे चालेल असे सांगत व्हीआयपी दर्शन बंदीचा निर्णय योग्य असल्याचेही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले आहे. राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना केंद्रीय मंडळात समावेश करण्याच्या संदर्भात तुम्ही केंद्रात शिफारस करा अशी मागणी या पत्रातून केली आहे. पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.