सोलापूर: सोलापुरात दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. मात्र मुसळधार पावसामुळे सोलापुरात अफवांचा पूर आल्याचं पाहायला मिळाला. सोलापुरातील अंत्रोळीकर भागात मगर आढळून आल्याचा एक फोटो सोशल मिडीयावरती व्हायरल झाला. क्षणार्धात ही बातमी वाऱ्याच्या वेगात सर्वत्र पसरली. हा मेसेज व्हायरल झाल्याने शहरातील चर्चेला पेव फुटलं. यंत्रणा कामाला लागली, वनविभाग, लोकप्रतिनिधी, पत्रकार सारेच घटनास्थळी पोहोचले.
मात्र प्रत्यक्षात असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं समोर आलं. तर AI चा वापर करून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचं या फोटोवरून दिसतंय. या भागात राहणाऱ्या लोकांनी भीती बाळगू नये तसेच जो कोणी वन्यजीव प्राण्यांचे खोटे फोटो व्हायरल करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील पावसाच्या प्रवाहात युवक वाहून जाताना वाचला
अक्कलकोट तालुक्यातील पावसाच्या प्रवाहात युवक वाहून जाताना वाचला आहे. अक्कलकोट तालुक्यातील बनजगोळ गावाजवळील केरसाळ येथील ही धक्कादायक घटना आहे. अक्कलकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाहत असलेल्या पाण्यात युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचला आहे. अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
नालाच्या प्रवाहात रिक्षाचालक गेला वाहून
सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकजवळ नालाच्या प्रवाहात रिक्षाचालक वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. सतीश सुनील शिंदे वय 36 असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महापालिकेचे अग्निशमन दल रात्रीचं घटनास्थळी झाले आहे. घटनास्थळावरून रिक्षा बाहेर काढण्यात आली असून वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध नाही. महापालिका प्रशासनाकडे कोणतेही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नसल्याने शोधकार्य करण्यास अडचणी येत आहेत.