Solapur : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युतत्र दिलं आहे. त्यांनी जयकुमार गोरेंबाबत शिवराळ भाषेचा वापर केला होता. यानंतर भाजपचे कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगरमध्ये संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदवण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे विरोधात टीका केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे विरोधात टीका केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर गावात संजय राऊत यांचा पुतळा दहन करत निषेध व्यक्त केला आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. पालकमंत्री गोरे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करताना संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता.
संजय राऊतांनी केलेली टीका भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली
राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांनी शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांची ही टीका भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. भाजपचे कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले होते जयकुमार गोरे?
उद्धव ठाकरे हे पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला. देहूत गोरे यांच्या हस्ते भाजपच्या कार्यलयाचे उद्घाटन आणि रुग्ण वाहिकेचे उद्घाटन झाले. त्यानंतर गोरे बोलत होते. विरोधी पक्षाला काही काम उरलेलं नाही. विरोधी पक्षांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असतो, यासाठी संसदेत चर्चा करणे अपेक्षित असतं. मात्र तसं न करता ते बाहेर अशी आंदोलनं करत बसतात. जनतेच्या लक्षात या गोष्टी येत असल्याचे गोरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व आता राहिलेलं नाही. ते त्यांचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायेत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील असे गोरे म्हणाले.