सोलापूर : जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोठा पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या महापुरामुळे (Flood) शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. आभाळच फाटलंय, मग सांगायचं कुणाला अशी काहीशी परिस्थिती असून अनेक गावात पाणी शिरलं होतं. काही गावांत नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडल्याने ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अगदी अन्न आणि पाण्याविना तीन दिवस जीव वाचविण्यासाठीची धडपड येथील बरड वस्तीतील ग्रामस्थांनी केली. तीन दिवसानंतर पुराच्या पाण्यातून (Rain) सुटका झाल्यानंतर डोळ्यात पाणी आणत त्यांनी आप बिती सांगितली.
माढ्यातील (Solapur) सीना नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याचा विळखा दारफळला बसल्यानंतर बरडवस्ती परिसरात जवळपास 32 लोकं अडकली होती. दोन दिवसानंतर काल एअरलिफ्ट करून यातील 10 जणांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, तरीही 22 लोक तीन दिवसापासून या पाण्याच्या विळख्यात घराच्या छतावर अडकून पडली होती. आपल्याला वाचवण्याचा प्रशासनाने कोणताही प्रयत्न केला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आज पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर या लोकांनी दिल्या. इंडिया रेपच्या टीमने या लोकांना आज सुखरुप बाहेर काढले, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते.
अन्न-पाण्याविना तीन दिवस; प्रशासनावर संताप (Three Days Without Food or Water Anger at Authorities)
आम्हाला कुठलेही फूड पॅकेट मिळाले नाहीत, ना साधे पिण्यासाठी पाणी. तीन दिवस उपास सहन करुन पिण्यासाठी महापुराचे गढूळ पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आल्याचे आल्याचे या बाधितांनी सांगितलं. एअरलिफ्ट करायला आलेल्या हेलिकॉप्टरवर यांचा रोष होता. या हेलिकॉप्टरने एकदा दोन आणि नंतर आठ असे केवळ दहा लोकांना दोन फेऱ्यात बाहेर काढून परत ते हेलिकॉप्टर फिरकलेच नसल्याचा संताप त्यांनी बोलून दाखवला. पुराच्या पाण्यात अडकलेली आपली मुले आज परत आल्याचे पाहून त्यांचे कुटुंब भावनिक झाले होते. आपली लाडकी व्यक्ती परत आल्याचे पाहून त्यांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. हर्नियाचे ऑपरेशन झालेले एक वयस्कर आजोबाही या अडकलेल्या 22 लोकांमध्ये होते. आठ दिवसापूर्वी ऑपरेशन होऊन, नंतर पुरात अडकल्याने 4 दिवस उपासमार सहन करावी लागल्याचे सांगताना कोणतेही औषध घेता आले नाही, असेही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या भागात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह असल्याने यापूर्वीही NDRF च्या बोटी असूनही बरड वस्तीमध्ये जाता आलं नाही, येथे जाता आले नसल्याचे NDRF च्या अधिकाऱ्याने सांगितले. तर, आज पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाल्यानंतर तीन बोटीने या लोकांना सुरक्षित काढल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा
काय सांगावं, सगळंच मातीत गेलं; पुराचं पाणी अन् संसार मोडून पडला, म्हातारा बाबा धाय मोकलून रडला