सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे.  31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर आता राज्य शासनाच्यावतीने किरण लोहार यांचे निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. 


पुढील आदेश येईपर्यंत किरण लोहार निलंबित राहणार आहेत. तर निलंबनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांची नेमणूक मुख्यालयात असणार आहे. दुसरीकडे काही वेळात किरण लोहार यांच्या जामीन बाबतीत ही निर्णय येण्याची शक्यता आहे. 


स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. सोमवारी ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहात ताब्यात घेतलं होतं.


या प्रकरणी 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानुसार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तातडीने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालक पुणे व शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केल्याने त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) मधिल नियम 4 नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल पाठविण्यात आला आहे.


कसे सापडले जाळ्यात? 


या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरचे उपाधीक्षक संजीव पाटील माहिती दिली. ते म्हणाले की, शिक्षण संस्था संचालक असलेल्या एका तक्रारदाराने या संदर्भात आमच्याकडे तक्रार केली होती. आपल्या शाळेतील वर्गवाढीचा प्रस्ताव तक्रारदाराने शिक्षण विभागाकडे पाठविला होता. यासाठी यु-डायस प्रणालीद्वारे वरिष्ठ कार्यालयाकडे हा प्रस्ताव पाठवण्यासाठी शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची ही मागणी असल्याचे आमच्या पडताळणीमध्ये समोर आले होते. लाचेच्या या रकमेपैकी 25 हजार रुपये स्वीकारताना शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही रंगेहात ताब्यात घेतले आहे. यानंतर शिक्षण अधिकाऱ्यांनी काही अपसंपदा जमा केली आहे का याची देखील चौकशी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.


रणजित डिसले गुरुजींनी केला होता आरोप 
  
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल रणजित डिसले यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला होता. तसेच त्यांना अमेरिकेची फुलब्राईट शिष्यवृत्तीही जाहीर झाली होती. किरण लोहार आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापैकी काही पैसे मागत असल्याचा आरोप रणजित डिसले यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला होता.