सोलापूर: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सोलापुरात देखील सासरच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात देखील चारचाकी आणि पैशाच्या हव्यासासाठीच सुनेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तीन वर्षांची चिमुकली मुलगी
सासरच्या मंडळींनी पैसे आणि चार चाकी वाहनासाठी छळ केल्यानेचं मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. काल (मंगळवारी) मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली होती. मृत आशाराणी भोसले हिला अवघ्या तीन वर्षांची चिमुकली मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होत्या. 2019 साली आशाराणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता. तर आशाराणीची बहीण उशाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याच्या भावासोबत ज्ञानेश्वर सोबत झाला आहे.
चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी तगादा
मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करत होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली असून सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहे. जो पर्यंत आरोपींना अटक होतं नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे.
छोट्या छोट्या कारणांवरून त्रास
चार चाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असं म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील आशाराणी पवन भोसले (वय 22) हिने राहत्या घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला आहे. प्रथम 'अकस्मात मृत्यू'ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत आशाराणी भोसलेच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
