सोलापूर : जिल्ह्यातील अनगर आणि मंगळवेढा नगराध्यक्षपदासाठीची (Election) निवडणूक स्थगित करण्यात आली असून नव्याने कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या आणि ज्यांच्या उमेदवारीने वाद निर्माण झाला त्या उज्ज्वला थिटे (Ujjwala thite) यांनी निवडणूक स्थगितीवर प्रतिक्रिया दिली. तसेच, अनगरच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोलापूर सत्र न्यायालयाने आमचा अर्ज फेटाळला असली तरी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तोपर्यंत निवडणूक आयोगाने ही निवडणूक स्थगित करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 6 नगरपालिकांमधील विविध प्रभागातील निवडणुकाही स्थगित झाल्या आहेत.
अनगर नगरपंचायत निवडणुकीला जी स्थगिती मिळाली त्याचा आनंदच म्हणावा लागेल. मला वाटतं नियतीचे फासे फिरलेत, पाटील परिवाराने किती वेळा आनंद साजरा करायचं हे त्यांनीच ठरवावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या उज्ज्वला थिटे यांनी लगावला. मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडथळे आले, तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज बाद झाला. कोर्टात देखील माझ्या विरोधात निकाल गेला, अधिकृत निकालाची प्रत आज संध्याकाळी मला मिळेल. त्यानंतर, आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उज्ज्वला थिटे यांनी दिली. तसेच, जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणुकीला स्थगिती राहावी, अशी मागणी मी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अर्ज बाद झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध नाही. अनगर नगरपंचायतमध्ये एकमेव अर्ज राहिलेल्या प्राजक्ता पाटील यांना अर्ज माघार घेण्याची संधी मिळेल. जर प्राजक्ता पाटील यांनी उमेदवार अर्ज माघारी घेतला नाही तर निवडणूक आयोगाला केवळ एक अर्ज शिल्लक आहे, असं कळवलं जाईल. त्यानंतर, अनगर बिनविरोधची अधिकृत घोषणा केली जाईल,असेही प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे, येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांची निवड ही बिनविरोधच झाल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, या पदासाठी एकमेव त्यांचा अर्ज दाखल आहे.
हेही वाचा
निवडणूक स्थगित, उज्वला थिटेंना नगराध्यक्षपदी अर्ज भरता येणार का? तहसीलदारांनी स्पष्टच सांगितलं