Solapur:सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावं जलमय झाली आहेत. या पुराचे कारण सीना कोळेगाव धरण प्रशासनाचे चुकीचे नियोजन असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी केला आहे. या संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Sina Kolegaon Flood)

Continues below advertisement

मराठवाड्यात पावसाने (Rain Update) सर्वत्र एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे. अतिवृष्टीने कधी नव्हे ते मराठवाड्यातील (Marathwada Rain) शेकडो गावांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. दरम्यान अद्यापही पावसाने आपला जोर कायम ठेवला असल्याने संकाटाचे काळे ढग अद्याप ओसरले नसल्याचे चित्र आहे.

अपुऱ्या नियोजनामुळे संकट?

शिवाजीराव सावंत यांनी सांगितले की,सीना कोळेगाव धरण 100% पेक्षा जास्त अरे पर्यंत अधिकाऱ्यांनी वाट का पाहिली? आधी वाट पाहिली नंतर अतिवृष्टी झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे साठलेलं धरणातील पाणी , विसर्ग यामुळे प्रचंड प्रमाणावर पाण्याचा साठा धरणामध्ये गेला. पाणी मोठ्या प्रमाणावर खाली सोडले. या सगळ्याची चौकशी व्हावी. एवढा वेळ थांबण्याची गरज नव्हती. 80 ते 90 टक्के धरण भरल्यानंतर या पाण्याचा विसर्ग करण्याचा नियोजन करायला हवे होते. त्यामुळे सीना नदीला महापूर आला आणि अनेक गावं पाण्याखाली गेली.

Continues below advertisement

वाकाव गाव जलमय

स्वतः शिवाजीराव सावंत यांचे वाकाव गाव पूर्णपणे पाण्याखाली गेल्याची माहिती त्यांनी दिली. “धरण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, घरे आणि जनावरं पाण्याखाली गेली. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. महापुरामुळे माढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभं पीक वाहून गेलं असून शेतजमीन चिखलमय झाली आहे. घरं आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं असून अद्याप अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे.

चौकशीची मागणी

या संदर्भात शिवाजीराव सावंत म्हणाले की, “धरण प्रशासनाने वेळेवर निर्णय घेतला असता, तर एवढं मोठं नुकसान टळलं असतं. यामध्ये गंभीर दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.