Continues below advertisement

सोलापूर : रयत क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आणि भाजपचे सहयोगी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी त्यांच्या भाषणातून मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांच्या (Rajan Patil) मुलाच्या कृतीचं समर्थन केल्याचं दिसून आलं. राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटील यांनी अनगर नगरपंचायतीच्या (Angar Election) निवडणुकीनंतर थेट अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान दिलं होतं. त्यावर 'तुमच्या मुलाने कुणाला तरी चॅलेंज दिलं याचं मला बरं वाटलं, त्यामुळे आले अंगावर तर घ्यायचे शिंगावर' असं वक्तव्य सदाभाऊ खोतांनी केलं. मात्र, थोड्याच वेळात माध्यमांशी बोलताना त्यांनी सारवासारवही केल्याचं दिसून आलं.

आमदार सदाभाऊ खोत हे मोहोळमध्ये प्रचारसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी बाळराजे पाटलांच्या रुपात आपल्याला एक जोडीदार मिळाल्याचं म्हटलं. विजयाची पहिली सलामी अनगरने दिली, असं म्हणत त्यांनी राजन पाटलांचे अभिनंदन केलं. आमचा संघर्ष हा वाडा विरुद्ध गावगाडा आहे. त्यामुळे वाड्याच्या विरोधात कुणीतरी बोललं याचा आनंद झाला असं म्हणत सदाभाऊ खोतांनी अजित पवारांना टोला लगावला.

Continues below advertisement

Angar Election : राजन पाटलांच्या मुलाचं अजितदादांना आव्हान

अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं. 'अजित पवार, कुणाचाही नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका' अशा शब्दात बाळराजे पाटील यांनी आव्हान दिलं.

बाळराजे पाटील यांच्या या कृत्याचं समर्थन आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं. मोहोळमधील सभेत बोलताना ते म्हणाले की, "विजयाची पहिली सलामी ही अनगरने दिली. तुमचा स्वभाव लढण्याचा आहे. तुमच्या मुलाने कुणाला तरी चॅलेंज दिलं याचं मला बरं वाटलं, त्यामुळे आले अंगावर तर घ्यायचे शिंगावर. तुमच्या मुलाचे अभिनंदन करतो, कारण माझं पण आयुष्य वाऱ्यावर दगड मारण्यात गेले. मला जोडीदार मिळाला. म्यानातून तलवार काढल्यावर त्याला रक्त काढल्याशिवाय ती म्यानात जात नाही."

Sadabhau Khot On Ajit Pawar : नंतर सदाभाऊंची सारवासारव

आधी राजन पाटलांच्या मुलाच्या कृतीचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊंनी नंतर मात्र काहीशी सारवासारव केल्याचं दिसून आलं. 'मी फक्त अनगरकरांचा नाद करायचा नाही एवढंच ऐकलं, अजितदादांचं नाव ऐकलं नाही' असं म्हणत सदाभाऊ खोतांनी नंतर सावध पवित्रा घेतल्याचं दिसून आलं.

सदाभाऊ खोत म्हणाले की, "गेली अनेक वर्षे विस्थापित हे प्रस्थापितांच्या विरोधात लढत होते, प्रस्थापित नुसते गुलाल उधळत होते आणि विस्थापित बांधावरून बघत होते. आता पहिल्यांदा प्रस्थापितांना धक्का बसला तर कशाला वाईट वाटून घ्यावं? आम्ही पण सोसलं आहे तसं त्यांनी पण सोसून घ्यावं. ही लढाई विस्थापितांची आहे, राजन पाटील यांचा मुलगा आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी आला याचा मला आनंद झाला. राज्यात विस्थापितांची गुढी उभारली पाहिजे."

निवडणुकीमध्ये ज्यावेळेस विजय मिळतो त्यावेळेस प्रतिस्पर्धी हा जिंकलेला असतो, त्यावेळी जिंकलेला योद्धा हा आनंदाने गर्जत असतो. 'सगळ्यांचा नाद करा पण आमचा करू नका' हे म्हणायला का कुणाची परमिशन काढावे लागते का? त्यामुळे मला वाटत तो आनंदोत्सव असतो आणि तो सगळेच साजरा करतात. याचा कुणाला का राग यावा? कारण विजयाच्या धुंदीमध्ये सगळेच नाचत असतात.

ही बातमी वाचा: