Continues below advertisement


Rajendra Raut : सोलापूर जिल्ह्यातील कथित साखर घोटाळ्याप्रकरणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विरोधात बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल केली असून, लवकरच ते हायकोर्टातही याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी मिळून जवळपास 100 कोटी रुपयांचा साखर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. आमदार दिलीप सोपल यांच्याशी संबंधित बार्शीतील आर्यन शुगर, अक्कलकोट येथील माजी आमदार सिद्रामआप्पा पाटील यांच्याशी संबंधित श्री स्वामी समर्थ सहकारी कारखाना आणि सांगोला येथील माजी आमदार दीपक आबा साळुंके यांच्याशी संबंधित सांगोला सहकारी कारखाना या तीन कारखान्यात हा साखर घोटाळा झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


...तर हायकोर्टात याचिका दाखल करणार


या घोटाळ्यांत साखर तारण ठेवून बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ना साखर उपलब्ध आहे ना त्या कर्जाची परतफेड करण्यात आली, असा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. या प्रकरणांतील गुन्हे काही महिन्यांपूर्वी नोंदवले गेले असून, या प्रकरणांची सखोल चौकशी ईडीमार्फत व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. मात्र, अद्यापपर्यंत ईडीकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याने राऊत यांनी लवकरच स्मरणपत्र सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही कारवाई झाली नाही, तर हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.


डीसीसी बँकेच्या बेकायदेशीर कर्ज वाटपावरूनही राऊत आक्रमक


राजेंद्र राऊत यांनी आणखी एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी बेकायदेशीर कर्जवाटप करून हजारो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. हायकोर्टानेही या प्रकरणात 1000 कोटी रुपयांची वसुली निश्चित केली असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्याचे सहकारमंत्री यांना स्मरणपत्र दिले आहे. "जर सहकारमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने सुनावणी न घेतल्यास, मी पुन्हा हायकोर्टात जाणार आहे," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. बेकायदेशीर कर्ज घेणारे संचालक आज जरी सत्तेत बसले असले तरी त्यांच्यावर कारवाई होणार असेदेखील राजेंद्र राऊत यांनी म्हटले आहे.



आणखी वाचा 


Rohit Pawar & Rajendra Raut: आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, तुमच्या आजोबांकडे इतकी संपत्ती कुठून आली? राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना सवाल