सोलापूर : राज्यात एकीकडे 10 वीच्या परीक्षेत (SSC Results) 100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत असून डिजिटल बॅनर आणि सोशल मीडियातही हे विद्यार्थी झळकत आहेत. मात्र, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात काठावर पास झालेल्या एका विद्यार्थ्यांचा (Student) सत्कार करण्यात आलाय. यंदाच्या वर्षी निकाल कमी लागला असला तरी शंभर टक्के गुण घेणारे राज्यभरात शेकडो विद्यार्थी समोर आले आहेत. मात्र, प्रत्येक विषयात करेक्ट 35 मार्क घेणारा पठ्ठ्या विठुरायाच्या पंढरीत (Pandharpur) पाहायला मिळाला. त्याच्या या 35 टक्के गुणांवरही तो आनंदी असून त्याचे पालकही खुश आहेत. त्यामुळे, सुरजप्रमाणेच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपल्या आयुष्याची पुढील दिशा ठरवली पाहिजे. 

पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथे दहावीत शिकणारा सुरज आप्पासो मलपे याला सर्व विषयात करेक्ट 35 मार्क मिळाले आहेत. सूरजची घरची परिस्थिती बेताचीच असून आई मजुरीला जाते तर वडीलही मिळेल ते काम करतात. त्यामुळे, सूरजला  देखील आई-वडिलांना कामासाठी मदत करतच शिकावे लागले, सूरजने अभ्यासासोबत घरच्यांना मदत म्हणून दूध व्यवसाय करत दहावीची परीक्षा दिली होती. शुक्रवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर सूरजने घेतलेल्या कष्टाला योग्य फळ मिळाल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांची आहे. सर्वच विषयात बरोबर 35 टक्के मार्क घेऊन सुरज दहावी पास झाला आहे. मला मिळालेले गुणांवर आपण आनंदी आणि समाधानी असल्याचे तो सांगतो. विशेष म्हणजे, सुरज दहावी पास झाल्यानंतर ग्रामस्थांनी, आई-वडिलांनी त्याला पुष्पहार घालून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे, परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा नापास झालो म्हणून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरजच्या आनंदाकडे पाहून आयुष्यात पुढील पाऊल टाकायला हवं. 

अकोल्यात विद्यार्थ्यांची धरणात उडी मारून आत्महत्या (SSC Results student)

राज्यात शुक्रवार 8 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, अपेक्षेप्रमाणे कमी गुण मिळाल्यामुळे नागपूर, संभाजीनगर आणि धारावीनंतर आता अकोला जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांने टोकाचं पाऊल उचललं. त्याला 69 टक्के गुण मिळाल्याची माहिती आहे. 'विठ्ठल संतोष बोर्डे' असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शिंगोली गावचा रहिवासी आहे. कारंजा रमजानपूर येथील धरतात उडी घेत त्याने आत्महत्या केली. 'अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर ' अशाप्रकारे सोशल मीडियावर स्टेट्स विठ्ठलने ठेवत हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून आतापर्यंत राज्यात दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे 4 विद्यार्थ्यांची आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये, 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. 

हेही वाचा

महाराष्ट्र बोर्डाच्या 179 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; मुंबई-पुण्याचा निकाल किती टक्के? दहावीच्या निकालाची ठळक वैशिष्ट्ये


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI