30 हजारांवर रोपांवर खर्च, लागवडीला 70 हजार अन् फवारणीसाठी 40 हजारांवर खर्च करूनही कांद्याला किंमत नाही; हताश शेतकऱ्यानं तीन एकरातील उभ्या पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला
केवळ रोपांवरच जवळपास 30 हजार रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर लागवडीसाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च करण्यात आले. तसेच खत आणि औषधांवर 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागला.

Desperate Farmer Ploughed 3 acres of Standing Onion: बार्शी तालुक्यातील उंबरगे येथे कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत आपल्या शेतातील उभे पीक ट्रॅक्टरने नांगरून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. संजय संदिपान देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, सततचा वाढता खर्च आणि अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे चित्र आहे. बार्शी तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तीन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड
मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी तीन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती. कांदा रोपांची किंमत प्रति किलो तीन हजार रुपये इतकी होती. त्यांनी सुमारे 10 किलो रोपे खरेदी करून लागवड केली होती. केवळ रोपांवरच जवळपास 30 हजार रुपयांचा खर्च झाला. त्यानंतर लागवडीसाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च करण्यात आले. तसेच खत आणि औषधांवर 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागला. अशा प्रकारे तीन एकर कांद्याच्या पिकासाठी एकूण मोठा खर्च उचलावा लागला होता.
उत्पादन खर्चही निघणे कठीण
मात्र, बाजारात कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. वाढते कर्ज, सततचा खर्च आणि हातात काहीच उरत नसल्याने देशमुख मानसिक तणावाखाली होते. अखेर वैतागून त्यांनी आपल्या शेतातील उभा कांदा ट्रॅक्टरने नांगरून टाकला.
केवळ 15 ते 16 रुपये प्रतिकिलो दर
दुसरीकडे, सध्या बाजारात कांद्याला केवळ 15 ते 16 रुपये प्रतिकिलो असा नीचांकी दर मिळत आहे. एकरी उत्पादन खर्च सुमारे 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बियाणे, खते, कीडनाशके, ठिबक सिंचन, वीजबिल, पाणीपुरवठा, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या दरात खर्चही निघणे कठीण झाले असून, नफा तर दूरच राहिला आहे. शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यात प्रक्रिया सुलभ करावी तसेच शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाव मिळाला तरच शेतकऱ्यांच्या श्रमाला न्याय मिळेल, अन्यथा कांदा उत्पादकांवर आर्थिक संकट आणखी गडद होईल, अशी भीती उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या

























