Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आजपासूनमराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे. कोणत्याह परिस्थितीत सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद राज्याच्या काही भागात उमटताना दिसत आहेत. आज माढ्यात (Madha) मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Minister Babasaheb Patil ) यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच धावत्या गाडी मागे पळत गाडी खाली घुसण्याचा प्रयत्न केला. बापू गायकवाड असं मराठा आंदोलकाचे नाव आहे.
पोलिसांनी आंदोलकाला घेतलं ताब्यात
मनोज जरांगे पाटील, एक मराठा लाख मराठा नावाने घोषणाबाजी करीत मराठा आरक्षण प्रश्नी भगवा पंचा गळ्यात घालून हे आंदोलन करण्यात आलंय. सुदैवाने ताफ्यातील गाड्या थांबवत पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. ही घटना घडताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गाडीतच होते. पोलिसांनीच मराठा आंदोलक बापू गायकवाड यांना गाडीखालून बाहेर फरफटत बाजूला काढल्यानंतर ताफा पुढे तुळजापूरच्या दिशेने गेला.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे आज माढ्याच्या दौऱ्यावर आले होते
दरम्यान, राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे आज माढ्याच्या दौऱ्यावर आले होते. माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या नेत्र शिबीराचे उद्घाटन आणि नवीन नेत्र रुग्णालयाच्या इमारतीच उद्घाटन बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज झाले. हा कार्यक्रम अटोपल्यानंतर परत जाताना माढ्यात मराठा आंदोलक बापू गायकवाड यांनी सहकारमंत्री पाटील यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तेच एक मराठा लाख माठा अशी घोषणाबाजी देखील केल्याचं पाहायला मिळालं.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार 100 टक्के सकारात्मक, बाबासाहेब पाटलांची एबीपी माझाला माहिती
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भात एबीपी माझाने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार चांगलेच काम करत आहे. 10 लाख लोकांच्या नोदी मिळाल्या असल्याचे मत बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे. सरकारचे यावर काम सुरुच असल्याचे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार 100 टक्के सकारात्मक असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
