सोलापूर : राज्यात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) मनोज जरांगे यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सोलापूरमध्ये येणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावेळी लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी सोलापूरमध्ये : लक्ष्मण हाके
मनोज जरांगे मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आई माई काढतोय. ओबीसीच्या मंत्र्यांच्या व्यंगावर टिंगल करतोय, त्यांच्या विरोधात ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या मी सोलापुरात येत आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापूरमध्ये सर्व ओबीसी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरागेंना जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल : लक्ष्मण हाके
मनोज जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी सोलापूरला येणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. विरोधी पक्ष सत्तेतले पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसीचे नेते यापैकी कोणीही ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाही. अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही. पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धमाकूळ घालतोय. आईमाईवरुन शिव्या घालतोय, ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्या नेत्यांना शिव्या देतोय, त्यांच्या जातीला शिव्या देतोय, त्यांच्या शारीरिक व्यंग्यावर बोलतोय. या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता आपण सोलापूरमध्ये मोहोळ मधून मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय, असं लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी बांधवांना विनंती असून आपल्याला आता एकीची वज्रमूठ बांधावी लागेल, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्याव लागेल, असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले.
