सोलापूर : सध्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कारने एका रिक्षावाल्यास धडक दिल्याने गौतमी चर्चेत असतानाच दुसरीकडे पूरग्रस्तांसाठी दुःखाच्या काळोखात लावणीसम्राज्ञी आणि लोकप्रिय नृत्यांगणा हिंदवी पाटील (Hindavi Patil) आशेचा किरण ठरल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड, परभणीसह मराठावाड्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं (Farmers) अतोनात नुकसान झालं असून बळीराजाचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं आहे. या आर्थिक संकटात सरकारसह स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तिगत मदत घेऊन अनेकजण मराठवाड्यातील बांधांवर पोहोचले आहेत. त्यामध्ये, पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी हिंदवी पाटील आपलं योगदान देत आहे. हिंदवी पाटीलने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील गावात जाऊन काही वयोवृद्धांसाठी ब्लँकेट वापट केले, तर चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी वह्यावाटप करुन हातभार लावला.
सोलापूर जिल्ह्यातील गावं अजूनही पावसाच्या जखमा सहन करत आहेत, शेतं वाहून गेली, घरं उद्ध्वस्त झाली, चिखलात मातीमोलाचं आयुष्य गाडलं गेलं. पण, या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बसला तो निरागस शाळकरी मुलांना, गावखेड्यातील त्यांच्या शाळांना. कोणाचं पुस्तकं पाण्यात वाहून गेलं, कोणाची शाळेची बॅग चिखलात हरवली, तर कोणाचे कपडेच ओलसर दुःखाने भिजून गेले. तर, काही ठिकाणी शाळाच पाण्यात गेल्याने शाळेचंच दफ्तर भिजलं आहे. मात्र, या शाळेच्या भिंतीचा ओलावा पाहून अनेकांना माझी शाळा आठवली, त्याच भावनेने या शाळांना, शाळेतील चिमुकल्यांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. त्यात, नृत्यांगणा हिंदवी पाटीलही एक पाऊल पुढे आहे.
हिंदवीकडून पूरग्रस्तांना मायेची उब
लावणीच्या रंगमंचावर आपल्या कलेने, रसिकांची मने जिंकणाऱ्या कलाकार हिंदवी पाटील हिच्या अंतर्मनाला देखील ही वेदना भिडली. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून हिंदवी स्वतः सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावोगावी पोहचत असून मुलांच्या डोळ्यात परत चमक यावी म्हणून पुस्तकं, वह्या, शालेय साहित्य वाटतं आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथे हिंदवी पाटीलने मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यावेळी, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू… हेच खरं हिंदवीचं समाधान, असे ती म्हणते. हिंदवी इथेच ती थांबली नाही, थंडीने थरथरणाऱ्या लहानग्या बाळांना आणि थकलेल्या वृद्धांनाही तिने स्वखर्चातून स्वेटर, ब्लॅंकेट देऊन मायेची उब दिली, आधार दिला. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात गावोगावी फिरत तिनं मुलांची विचारपूस केली, त्यांच्या वेदना ऐकल्या आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत त्यांना नव्या उमेदीनं जगायला धीर दिल्याने सोशल मीडियातूनही तीचं कौतुक होत आहे.
दरम्यान, हिंदवी पाटील आज फक्त एक लावणी कलाकार नाही, तर पूरग्रस्तांच्या वेदना ओळखून त्यांना या परिस्थितीतून सावरायला शिकवणारी, आशेचा किरण ठरणारी एक संवेदनशील व्यक्ती म्हणून प्रेरणादायी ठरली आहे.