Shaktipeeth Expressway: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग हा पालखी महामार्ग व पुणे-सोलापूर महामार्गास समांतर आहे. शेतकऱ्यांचा या महामार्गास विरोध असून एक इंचही जमीन न देण्याचा संकल्प राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोकोच्या आंदोलनादरम्यान केला. माढा तालुक्यातून सर्वाधिक द्राक्ष, ऊस व डाळींब बागायती जमीनी यासाठी संपादित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांनी उजनी डाव्या कालव्यातून 10 ते 12 किलोमीटर पाईपलाईन करून जमीनी बागायती केलेल्या आहेत. आज (17 मे) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माढा तालुक्यातील अरण या गावी पुणे-सोलापूर महामार्ग रास्ता रोको करून बंद ठेवण्यात आला. 

महामार्गावर बेमुदत बसण्याचा इशारा 

दरम्यान, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्यानंतर पंधरा मिनीटांतच पोलिसांनी शेतकऱ्यांना महामार्गावरून अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजू शेट्टी यांनी संतप्त होवून पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. पोलिसांनी दडपशाही केल्यास राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत बसण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी सयंमाची भूमिका एक तास रास्ता रोको झाला. 

ग्रामस्थांचा महामार्गास विरोध 

संत सावता माळी यांची संजीवन समाधी असलेल्या गावात 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' हा त्यांचा जगप्रसिद्ध अभंग याच अरण गावच्या मातीतील शेतामळ्यात रचला गेला. दरवर्षी आषाढी वारी झाल्यानंतर स्वतः विठ्ठलाची पालखी सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूरहून अरण गावी येते. याच गावातून शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने व 600 एकर जमीन यासाठी संपादित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी या मार्गास विरोध केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील गावांमधून लढा तीव्र होत असून शेतकरी संघटित झाला आहे. 

आंदोलनाची धग कायम 

राज्यातील 13 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध होत आहे. सर्वच भागातून शक्तिपीठ महामार्गास कडाडून विरोध होत असून रास्ता रोको, मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलन यासारखी आंदोलने करून शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग कायम ठेवली आहे.

कोल्हापुरात सर्वपक्षीय मेळाव्याची हाक

दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय मेळाव्याची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावड्यात श्रीराम सोसायटीत सकाळी 11 वाजता हा मेळावा होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मेळाव्याची हाक दिली आहे. बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या