सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
या अर्जावर न्यायालयाने म्हणणं ऐकून घेतलं. इच्छामृत्यू, अवयवदान आणि उपोषणाची आरोपीची मागणी सुरू असलेल्या खुनाच्या खटल्यापेक्षा वेगळी बाब असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने अर्ज निकाली काढला.

Solapur Crime: सासऱ्याच्या खुनाच्या आरोपाखाली मागील 16 महिन्यांपासून कारागृहात असलेल्या आरोपीने चक्क इच्छामृत्यू आणि अवयवदानासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मंगेश देविदास सलगने हा अर्ज केला आहे. पती-पत्नीच्या वादातून मंगेशने सासरे बापूराव माशाळ यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा खून केल्याचा आरोप मंगेशवर आहे. सासऱ्यांवर चाकूने वार केल्यानंतर सासू आशा आणि मेव्हणा अभिषेक यांनाही गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी त्याला 28 एप्रिल 2025 रोजी अटक करून दोषारोपपत्र दाखल केलं आहे. सोलापूर सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे.
तोपर्यंत आमरण उपोषण करण्याची परवानगी द्या
तथापि, 19 ऑगस्ट 2026 रोजी सुनावणीदरम्यान आरोपी मंगेशने सोलापूर न्यायालयात अर्ज देत कारागृहात राहण्याची आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती राहिली नसल्याचे सांगितले. आपल्याला इच्छामृत्यू देण्यात यावा आणि मृत्यूनंतर अवयवदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याने केली. जोपर्यंत मागणी मंजूर होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याची परवानगी आणि उपोषणादरम्यान सुरक्षा देण्याची मागणीही त्याने केली. या अर्जावर न्यायालयाने सरकारी वकील आणि कारागृह प्रशासनाचं म्हणणं ऐकून घेतलं. इच्छामृत्यू, अवयवदान आणि उपोषणाची आरोपीची मागणी सुरू असलेल्या खुनाच्या खटल्यापेक्षा वेगळी बाब असल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने अर्ज निकाली काढला. मात्र, आरोपीचं समुपदेशन करण्यास आणि गरज भासल्यास वैद्यकीय मदत देण्याचे आदेश न्यायालयाने सोलापूर कारागृह अधीक्षकांना दिले असल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. धनंजय माने यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






















