Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. आंबोलीमधील महादेव गड पॉईंटमधून पर्यटक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. सायंकाळी साडेपाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 400 फुट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची माहिती समोर आली आहे. आयुब सय्यद राहणार निपाणी असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्कयू टीम आंबोली-सांगेलीकडून शोधमोहीम सुरु होती. शोधकार्यात अडचणी आल्यामुळं थांबवण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केले. त्यानंतर डॉ. अय्युब सय्यद (45) यांचा मृतदेह सापडला आहे. कर्नाटकच्या निपाणी येथील रहिवासी आहेत.
पाऊस अन् धुकं, काळोख झाल्याने शोधमोहिमेत अडचणी
पर्यटक खोल दरीत कोसळल्याने व पाऊस अन् धुकं, काळोख झाल्याने ही मोहीम उद्या सकाळी 6 वाजता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी घटनेची माहिती घेतली आहे. दरीत कोसळलेला पर्यटक पेशाने डॉक्टर असल्याचीही माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक आपत्कालीन बचाव पथक 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम' (आंबोली-सांगेली) च्या सदस्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमच्या जवानांनी तात्काळ दरीत उतरून शोधमोहीम सुरू केली. मात्र, सायंकाळच्या वेळी आंबोली परिसरात मुसळधार पाऊस, दाट धुके आणि हळूहळू पसरणारा काळोख यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रचंड अडथळे येत आहे. धुक्यामुळे दरीतील दृश्यमानता कमी झाल्याने आणि रात्रीच्या वेळी अपघात घडण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने व सह्याद्री रेस्क्यू टीमने आज रात्रीपुरती ही शोधमोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात येणार आहे. घाटमाथ्यावर सातत्याने होणाऱ्या पावसाने आणि धुक्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आंबोली पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. या घटनेमुळे निपाणी आणि आंबोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.