सिंधुदुर्ग : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार या संदर्भात माहिती दिली. मे महिना पूर्ण होण्याअगोदर मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल, असा शब्द नितीन गडकरी यांनी दिला. गडकरींनी यावेळी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं काम 90 टक्के झाल्याचं सांगितलं. तो मार्ग देखील मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करु असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. यावेळी गडकरींनी मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नसल्याचं सांगितलं. 

Continues below advertisement

नितीन गडकरी काय म्हणाले? 

नितीन गडकरी यांनी मूळ भाषण संपल्यानंतर परत भाषणाला सुरुवात करत मुंबई गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की मला खूप लोकांनी विचारलं पण या कार्यक्रमात राजकारण किंवा कशावर बोलणं योग्य नाही म्हणून मी बोललो नाही. पण राणे साहेबांच्यासमोर सांगतो कारण ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही. कोल्हापूर ते रत्नागिरी हा ९० टक्के रस्ता पूर्ण झालेला आहे. आम्ही एक टनेल बांधणार आहोत.  हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास देतो. आज राणे साहेबांच्या समोर शब्द देतोय तसेच मी जसं राणे साहेबांच्याकडून शिकलो आहे की राजकारणात मी खोटं बोलत नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

उद्घाटनला येणार नाही : नितीन गडकरी

मुंबई गोवा महामार्गापायी एवढी बदनामी सहन केली आहे की मी काही उद्घाटनाला येणार नाही. मी आताच देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसू आणि मुंबईहून गोव्याला जाऊ, तिकडून विमानानं नागपूरला जाऊ, असं नितीन गडकरींनी म्हटलं.  कारण मला देखील दु:ख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. राणे साहेबांचा या संदर्भात सारखा फोन असायचा. मे महिना पूर्ण होण्याअगोदर काम संपेल असा विश्वास देत असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलं. 

Continues below advertisement

नितीन गडकरी नारायण राणेंबद्दल काय म्हणाले?

नितीन गडकरी म्हणाले की माझ्या राजकारणाच्या सुरुवाती पासून नारायण राणेंचा राजकीय प्रवास पाहिला आहे. नारायण राणे जीवनात उतार चढाव पार करत पुढे गेले. विधिमंडळात मंत्री म्हणून कामगिरी सर्वांनी पाहिली. 18 ते 20 वर्षे मी राज्याच्या राजकारणात कार्य केलं, याकाळात नारायण राणे यांचा मित्र म्हणून सहवास लाभला.राणेंचे खंबीर समर्थन राहिल्याने मुंबईत अनेक पूल झाले. राणेंच्या राजकीय जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्वाची स्पष्टता होती. खरा नेता ओळखायचा असेल तर जनतेचे निर्णय घेताना खंबीरपणा करणे आवश्यक असते आणि राणेंची तिच ओळख आहे. विधानसभा सभेत विरोधी पक्षनेते म्हणून राणेंनी प्रभावी काम केलं, असं नितीन गडकरी म्हणाले.