सिंधुदुर्ग :गोवा (Goa) पाहायला आणि फिरायला जायचं हे अनेकाचं पर्यटन स्वप्न असतं. कित्येकदा तुम्ही गोव्याला जायचं प्लॅनिंग करता, आणि ती ट्रीप काहीवेळ रद्दही होते. सोशल मीडियावरही गोवा ट्रीपचे मजेशीर मिम्सही व्हायरल होतात. तर, पर्यटनस्थळी अनेकदा साहसी खेळ, जलक्रीडा करण्याचा आनंदही आपण घेत असतो. पॅराग्लायडिंग करताना अनेकदा काहीजण स्टंट देखील करतात, मात्र काहीवेळा हेच पॅराग्लायडिंग जीवावर बेतू शकतं. गोव्यात एका महिला पर्यटकास (Tourist) असाच एक अनुभव आला असून सुदैवाने तिचा जीव बचावला आहे. सुष्मिता यांनी जागरुकता आणि सावधानतेसाठी ही पोस्ट शेअर केल्याचं म्हटलं आहे.
जगभरातील पर्यटक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात पर्यटनासाठी येतात. त्यात पर्यटक वेगवेगळ्या ते जीवाचा गोवा देखील करतात. मात्र, एका पर्यटक महिलेने पॅरासेलिंग करताना अत्यंत भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर करत पर्यटकांना सतर्क केलं आहे. सुष्मिता नावाच्या एका महिलेने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून हा आनंददायी अनुभव तिच्यासाठी मृत्यूचा सापळा कसा ठरला असता याविषयी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुष्मिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “1 मिनिटाचा थरार… ज्यामुळे माझं सगळंस्व धोक्यात आलं होतं”. गोव्यातील पॅरासेलिंगचा एक मजेशीर अनुभव म्हणून जे सुरू झालं… त्याचा शेवट समुद्राच्या मध्यभागी माझी होणारी धडपड असा झाला. पाण्यात पडलो, गळ्याभोवती दोर. घबराट. शांतता. भीती... जेव्हा तुमच्या लक्षात येतं की… आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही, तेव्हाची ती भावना कोणताही कॅमेरा टिपू शकत नाही. मी नशीबवान होते. कोणीतरी आलं, कोणीतरी मला वाचवलं. प्रत्येकालाच ती दुसरी संधी मिळत नाही. कोणताही जलक्रीडा प्रकार करून पाहण्यापूर्वी सुरक्षितता तपासा, तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. कारण, काही अनुभव केवळ आठवणी म्हणून राहत नाहीत, ते मानसिक आघात म्हणून कायम राहतात, अशी जागरुक करणारी आणि पर्यटन ठिकाणी अतिउत्साह दाखवणाऱ्या पर्यटकांना सावध करणारी पोस्ट सुष्मिताने लिहिली आहे.
