Anganewadi Jatra 2026 : कोकणातील (Konkan) प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी (Anganewadi Jatra) देवीच्या जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. त्यानुसार, नवीन वर्षात 9 फेब्रुवारीला ही जत्रा सुरु होणार आहे. साधारण दीड दिवसांची ही यात्रा असते. आज सकाळी देवीचा कौल घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली. आंगणेवाडीच्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस निश्चित करण्यात येतो. यावेळी अनेक राजकीय नेत्यांसह लाखो भाविक यात्रेस उपस्थित असतात. 

Continues below advertisement

आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठीसुद्धा चढाओढ लागणार आहे. प्रथेनुसार देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित झाली आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवतात.

नवसाला पावणारी भराडी देवी

मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला 'भराडी देवी' असं नाव पडलं.

Continues below advertisement

मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबियांची ही देवी आहे. तसा फलक आंगणे कुटुंबियांचं खाजगी मंदिर म्हणून फलक लावला आहे. मात्र, नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने देवीचं दर्शन सर्वांसाठी खुलं असतं. यावेळी गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.

दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. यावेळी सर्वांसाठी आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात. 

धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात. 

भराडी देवीच्या यात्रेला कसं जाल?

कणकवली, कुडाळ रेल्वे स्टेशनपासून डेपोपर्यंत जाण्यासाठी शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. या दोन्ही बस डेपोतून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस असतात. आंगणेवाडीपर्यंत एसटीच्या तिकीटाचा दर अगदी माफक ठेवण्यात येतो. जर तुम्ही खासगी वाहनाने प्रवास करणार असाल तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन कुडाळ, कसाल, कणकवली या मार्गे आंगणेवाडीपर्यंतचा पुढचा प्रवास करता येईल.

हे ही वाचा : 

Horoscope Today 3 December 2025 : आज बुधवारच्या दिवशी 5 राशींवर प्रसन्न होणार बाप्पा! मागाल ती इच्छा होईल पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य