Siddharth Shinde : सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांचं काल (सोमवारी, ता 15) रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक होत आहे. अभिनेता रितेश देशमुखने देखील सिद्धार्थ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थ शिंदे हे अभिनेता रितेश देशमुखचे चांगले मित्र होते. दोघे वर्गमित्र होते अशी माहिती स्वत: रितेश देशमुखने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत दिली आहे. रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटात सिद्धार्थ शिंदे यांनी छोटी भूमिका देखील साकारली होती.
पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय रितेश देशमुखने?
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुखने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ शिंदे माझा प्रिय शाळेतील वर्गमित्र आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील, खूप दयाळू, नम्र, नेहमीच हास्य आणि अढळ पाठिंबा देणारा होता असे रितेश देशमुखने म्हटलं आहे. सहा वर्षांपूर्वी, जेव्हा त्याला समजले की, मी आपल्या प्रिय छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत आहे. तेव्हा त्याने मला इतक्या उत्कटतेने फोन केला. रितेश, कृपया मला 'राजा शिवाजी'चा भाग होऊ दे, जरी तो पडद्यावर छोटा सीन असला तरी. शिवरायांबद्दलचे त्याचे प्रेम हेच होते असे रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वी, आम्ही संजय दत्त सरांसोबत दोन सुंदर दिवस एकत्र शूटिंगमध्ये घालवले. त्यांच्या उपस्थितीने सेटवर वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. आज त्याचा सीन एडिट करत असताना, त्याने किती सुंदर काम केलं आहे हे पाहत हसत असताना, हा आनंद त्याच्यासोबत शेअर करण्यासाठी फोन करावा असं मला वाटलं. मग धक्कादायक बातमी आली, की तो आता आपल्यात नाही. आपण एकत्र हा चित्रपट पाहत आहोत, हसत आहोत, आठवणी काढत आहोत याची कल्पना करतानाही माझं मन भरुन येत आहे. नियतीने काही वेगळंच ठरवलेलं असतं," अशी खंत रितेशने व्यक्त केली आहे.
सिद्धार्थ, माझा भाऊ, तू एक दुर्मिळ रत्न होतास. तुझ्या कुटुंबासह प्रियजनांसोबक माझी मनापासून सहानुभूती. शांती लाभो, प्रिय मित्रा - तू आमच्या हृदयात कायमचा जिवंत राहशील अशा शब्दात रितेश देशमुखने सिद्धार्थ शिंदे यांना भावनिक पोस्ट करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कोण होते सिद्धार्थ शिंदे?
सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील होते. ते महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने जाण आणि संविधानाविषयी सखोल ज्ञान असलेले विधिज्ञ म्हणून ओळखले जायचे. न्यायालयीन निर्णय आणि क्लिष्ट कायदेशीर बाबी सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. ते माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.
महत्वाच्या बातम्या: