Beed News : राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला (Shaktipeeth Expressway) आता बीड जिल्ह्यात (Beed News) विरोध होताना दिसून येत आहे. बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून या ठिकाणचे शेतकरी या महामार्गाविरोधात आक्रमक झालेले दिसून आले आहेत.
शक्तीपीठ महामार्गाला एक इंचही जमीन न देण्याचा निर्धार
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. पिंपळा धायगुडा,भारज,गित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केलाय. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केलीये. यावेळी महिला शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली मोजणी सोडून माघारी जावे लागले आहे.
राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने महायुती सरकार सत्तेत आलं आहे. अशातच राज्य सरकारचा अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. असे असलं तरी नागपूर ते गोवा जाणाऱ्या या महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. या विकासकामाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठला विरोध होत आहे. अशातच आता या विरोधाची धग बीड जिल्ह्यापर्यंत पोहचली आहे.
कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तीपीठ महामार्ग?
सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा, , नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव होता.
कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा होता शक्तीपीठ महामार्ग?
शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत. यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, पट्टणकोडोली, कणेरी, आदमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता.
इतर महत्वाच्या बातम्या