Shah Rukh Khan : शाहरुख खनला आज बॉलिवुडचा किंग म्हणून ओळखले जाते. त्याच्याकडे हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर आता त्याला पैशांचा विचार करावा लागत नाही. त्याने नुकतेच एक 76 लाख रुपयांचे घड्याळ घातले होते. सर्व सुखवस्तू त्याच्या दिमतीला आहेत. दरम्यान, आज शाहरुख खान कोट्यवधींचा मालक असला तरी त्याची सुरुवात फारच खडतर झालेली आहे. त्याचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे. खिशात पैसे नसल्यामुळे त्याने कधीकाळी खुर्च्या लावण्याचे काम केले होते. या कामातून त्याला पहिली कमाई म्हणून 50 रुपये मिळाले होते. 


हातात पैसे नव्हते, मग केलं खुर्च्या लावण्याचं काम


शाहरुख खानचा 2017 साली रईस नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या प्रमोशसनासाठी शाहरूख  खान एका कार्यक्रमात गेला. यात शाहरुखने त्याच्या पहिल्या कमाईबाबत सविस्तर सांगितले होते. शाहरुख खानने सांगितलं होतं की, तो तेव्हा 17-18 वर्षांचा होता. त्याने तसेच त्याच्या मित्रांनी ताजमहल पाहायला जाण्याचे ठरवले होते. मात्र ताजमहलला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे पैशांची तजवीज कशी करावी, याचा ते विचार करत होते. हा विचार करत असतानाच दिल्लीतील एका मैदानावर गायक पंकज उदास यांच्या गीतगायनाचा एका कार्यक्रम होणार असल्याचे त्यांना समजले. शहरुख तसेच त्याचे मित्र त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे कार्यक्रमाच्या आयोजकाने खुर्च्या व्यवस्थित लावल्यास तसेच पाहुण्यांना व्यवस्थित बसण्यासाठी मार्गदर्शन केल्यास मी तुम्हाला प्रत्येकी 50 रुपये देईल, असे आश्वासन दिले. 


मग मिळाले 50 रुपये


त्यानंतर शाहरुख तसेच त्याच्या मित्रांनी कार्यक्रमाच्या सर्व खुर्च्या लावल्या. कार्यक्रम संपल्यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या मित्रांना आयोजकाने प्रत्येकी 50 रुपये दिले. अशा प्रकारे त्यांनी ताजमहल फिरायला जाण्यासाठी पैशांची तजवीज केली होती. शाहरुखची आयुष्यातील ही पहिली कमाई होती. विशेष म्हणजे या पैशांनी शाहरुख खान तसेच त्याचे मित्र ताजमहल पाहायला गेले होते. आग्र्याला गेल्यानंतर तिकीट, जाण्यासाठीचा खर्च यामध्येच हे 50 रुपये संपून गेले होते, अशी आठवणही शाहरुख खानने सांगितले होती. 






आता शाहरुखचा किंग चित्रपट येणार


दरम्यान, शाहरुख खान दिल्लीमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. तो 15 वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. शाहरुख खानने दुरदर्शनवरील फौजी या मालिकेतून त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. दिवाना हा शाहरुखचा पहिला चित्रपट आहे. 2023 साली त्याचे एकूण तीन चित्रपट आले. त्याचा पठाण आणि जवान हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तर डंकी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता त्याचा किंग हा चित्रपट येणार आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खान हीदेखील या चित्रपटात दिसणार आहे. 


हेही वाचा :


शाहरुख खानचा नाद खुळा! हातात घातलं तब्बल 76 लाखांचं घड्याळ, फिचर्स वाचून व्हाल थक्क!