Serbia PM Milos Vucevic : देशातील दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या नोवी सॅड येथील रेल्वे स्टेशनच्या छताचा काही भाग कोसळून पंधरा जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आला. यानंतर परिवहन मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, विद्यार्थ्यांचा रोष वाढतच चालल्याने पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला. सर्बियाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक (Serbia PM Milos Vucevic) यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, त्याच्या हकालपट्टीसाठी नोव्हेंबरपासून देशभरात निदर्शने सुरू होती.
हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले
1 नोव्हेंबर रोजी सर्बियाचे दुसरे सर्वात मोठे शहर नोवी सॅड येथील रेल्वे स्टेशनच्या छताचा काही भाग कोसळला होता. यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि या घटनेची जबाबदारी घेण्याची मागणी करू लागले. बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळे बाल्कनी कोसळण्याची घटना घडल्याचा आरोप लोकांनी केला.
परिवहन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरही लोकांचा रोष थांबलेला नाही
नोवी सॅड घटनेत तेरा जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यात माजी परिवहन मंत्री गोरान वेसिक यांच्या नावाचाही उल्लेख होता. मात्र, या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आंदोलकांचा संताप कमी झाला नाही. या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ते देशभरात दररोज रात्री 11.52 वाजता 15 मिनिटे वाहनांची वाहतूक रोखत असत. याच वेळी रेल्वे स्थानकावर बाल्कनी पडून अपघात झाला होता. याशिवाय देशातील विद्यापीठांमधील अभ्यासही ठप्प झाला होता.
24 नोव्हेंबरनंतर आंदोलन तीव्र झाले
24 जानेवारी रोजी देशातील निदर्शने तीव्र झाली. लोकांनी कामावर जाणे बंद केले. सर्बियाची राजधानी बेलग्रेडमधील सर्वात व्यस्त रस्त्याच्या 24 तासांच्या नाकेबंदीदरम्यान विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात एक मुलगी जखमी झाल्यामुळे सोमवारी तणाव वाढला. पंतप्रधान वुसेविक म्हणाले की, देशातील तणाव आणखी वाढू नये अशी त्यांची इच्छा आहे, त्यामुळे परिस्थिती शांत करण्यासाठी ते आपले पद सोडत आहेत. वुसेविक मे 2024 पासून पंतप्रधानपदावर होते. याआधी त्यांनी उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्रीपद भूषवले होते.
जेव्हा नोव्ही सॅड रेल्वे स्टेशन बांधले गेले तेव्हा वुसेविक शहराचे महापौर
वुसेविक 2012 ते 2020 पर्यंत नोवी साडचे Novi Sad महापौर होते. यावेळी रेल्वे स्थानकावर इमारतीसंदर्भातील कामे करण्यात आली. त्यामुळे वुसेविकवर पद सोडण्याचा प्रचंड दबाव होता. मिलोस वुसेविक यांनी नोव्ही सॅडचे महापौर मिलान ज्युरिक देखील मंगळवारी पद सोडतील, असे जाही केले. तथापि, सर्बियामध्ये खरी सत्ता राष्ट्रपतींकडे असते. सध्या सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक आहेत. पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे आंदोलकांचा राग कमी होईल आणि ते वाटाघाटीच्या मार्गावर परततील अशी आशा आहे, असे वुकिक म्हणाले.
पंतप्रधान वुसेविक यांच्या राजीनाम्यामुळे देशात लवकर संसदीय निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्बियन कायद्यानुसार, पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर, त्याला सर्बियन संसदेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. मंजुरीनंतर 30 दिवसांच्या आत पंतप्रधानांची निवड व्हायला हवी. तसे झाले नाही तर सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या