पुणे : अभिनेते श्रीराम लागू यांचं वृद्धपकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उद्या (18 डिसेंबर) ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. 1950 च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात पाच वर्षे काम केले . नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1960 च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता.
भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी 1969 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या 'नटसम्राट' या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले 'रूपवेध' तसेच 'लमाण' हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहे.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2019 10:06 PM (IST)
लागू यांना फिल्मफेअर पुरस्कार, कालिदास सन्मान, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, राजश्री शाहू कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -