नागपूरः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर आजपासून एक जुलैपर्यंत हरकती व सूचना घेण्यात येणार आहे. नऊ जुलैपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.


निवडणुकीपूर्वीच सर्व प्रक्रिया या माध्यमातून पूर्ण झाली असून नऊ जुलैनंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच अंतिम प्रभाग रचनेस मंजुरी प्रदान केली आहे. तत्पूर्वी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करिता आरक्षण सोडत 21 मे रोजी काढण्यात आली होती. 13 जूनला याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


या संकेतस्थळावर शोधा आपले नाव


नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महानगरपालिका संकेतस्थळावर  www.nmcnagpurelection.org/ प्रसिद्ध करण्यात आली असून सदर यादी मध्ये आपले नाव पाहण्‍यासाठी प्रभागनिहाय याद्यांपैकी आपल्या प्रभागाची यादी डाउनलोड करा.


या चुका करता येणार दुरुस्त


मतदार याद्यांचे विभाजन करतांना लेखनिकांकडून झालेल्या चुका दुरुस्तीसाठी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी मनपाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या संदर्भातील दुरुस्त्या करण्या संबंधाने हरकती व सुचना असल्यास 23 जून ते 1 जुलै या कालावधीत संबधीत प्रभागाचे क्षेत्रिय झोन कार्यालयात व निवडणूक कक्ष मुख्यालयात लेखी स्वरुपात द्यावा असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.


महत्वाचे...


महानगरपालिका क्षेत्राटी एकूण लोकसंख्याः 24 लाख 47 हजार 494
अनुसूचित जातीची लोकसंख्या (जनगणनेनुसार)ः 04 लाख 80 हजार 759
अनुसूचित जमातीची लोकसंख्या (जनगणनेनुसार) 1 लाख 88 हजार 444
प्रभागाची एकूण संख्या (त्रिसदस्यीय प्रभाग) 52
निवडून द्यावयाच्या महापालिका सदस्यांची संख्या 156


मतदार संख्या


2017 दरम्यान 20,93,392 मतदार


2022 मध्ये एकूण 22,31,590 मतदार 


2017 च्या तुलनेत 1,38,198 म्हणजेच 6.6 टक्के मतदार वाढले आहेत


मतदार यादी शुद्धीकरण


5 जानेवारी 2022 रोजी 21,97,244 मतदार


31 मे 2022 रोजी 22,93,131 मतदार


हटवलेले मतदार 61,541


सध्या नोंदणीकृत एकूण मतदार 22,31,590