सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर आणि मालगाव या दोन्ही गावांच्या मध्ये असलेल्या न्हाळेवाडी या गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्हाळेवाडी येथे बिबट्याने हल्ल्यानं केल्यानं दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. जय खंडागळे असे मृत बालकाचे नाव आहे.बिबट्याने बालकावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत जयला शासकीय रुग्णालयात घेऊन आले आहेत.. रुग्णालयाच्या बाहेर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे..या घटनेमुळे नाळेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या बाळाचा मृत्यू
न्हाळेवाडी परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून वावरणाऱ्या बिबट्याने आज रात्री साडेसातच्या सुमारास जय संदीप खंडागळे या दोन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेले.संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झालेला असताना अंधाराचा फायदा घेत बिबट्याने हा हल्ला चढवला. बिबट्यानं बाळाला 500 मीटर ओढत उसाच्या शेतामध्ये नेले. ग्रामस्थांनी पाठलाग करून बाळाला सोडवले, मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.न्हाळेवाडी,शिवथर,कोलवडी, मालगाव या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी करूनही वनविभागाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी होत आहे.
सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. जय खंडागळे हा दोन वर्षाचा बालक घराबाहेर खेळत होता. खेळत असताना बिबट्यानं त्याला पकडून नेलं, यानंतर माणसांनी त्याच्यामागे धाव घेतली. लोकांच्या गोंधळामुळं बिबट्या पळाला, लहान मुलाचा मृतदेह सापडला. परंतु त्याला सिव्हीलला आणलं होतं, त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. पुढील प्रक्रिया सुरु आहे, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करु, असं आश्वासित केलं आहे, अशी माहिती निलेश तांबे यांनी दिली.
ग्रामस्थांचं म्हणनं तक्रारी दिल्या होत्या असं म्हणत आहेत, ते बरोबर आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी सातपुते यांच्याशी चर्चा झाली असून ते चौकशी करत आहेत, असं निलेश तांबे म्हणाले. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
न्हाळेवाडीतील घटना मन हेलावून टाकणारी : शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी न्हाळेवाडीतील घटना मन हेलावून टाकणारी असल्याचं म्हटलं आहे. न्हाळेवाडी ता. सातारा येथे बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या २६ महिन्यांच्या चिमुरड्या जय संदीप खंडागळे याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या निष्पाप चिमुरड्याला भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित वनविभागातील अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील डोंगराळ भागातील नागरिकांनीही विशेष सतर्कता बाळगावी आणि बिबट्या किंवा अन्य वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलं.
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुःखद प्रसंगी खंडागळे परिवाराच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या कुटुंबाला या कठीण प्रसंगी शासनाने तातडीने आवश्यक ती मदत जाहीर करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने अधिक प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असं शशिकातं शिंदे म्हणाले.
दरम्यान, सातारा तालुका पंचायत समितीचे सदस्य राजेश मोहन पवार तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते.
