Satara NEET exam death News: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (NEET Exam) अपयश आणि वाढत्या मानसिक ताणातून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे येथील 18 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. समीक्षा दीपक पवार (18) असे या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव असून, कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
Satara NEET exam death News: काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षाने गेल्या वर्षी 4 मे 2025 रोजी झालेली नीट (NEET) परीक्षा दिली होती. मात्र, या परीक्षेच्या निकालात अपेक्षित यश न मिळाल्याने ती गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणाव आणि नैराश्यात होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
याच मानसिक तणावातून तिने 23 जुलै रोजी घरात उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. सुरुवातीला समीक्षाने ही बाब घरातील कोणालाही सांगितली नाही. मात्र, दोन दिवसांनंतर विषाचा तीव्र परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्रास असह्य झाल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
Satara NEET exam death News: उपचारादरम्यान मृत्यू, परिसरात हळहळ
घडलेला प्रकार समजताच नातेवाईकांनी 26 जुलै रोजी समीक्षाला तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, विषाचा संसर्ग शरीरात पसरल्याने उपचारादरम्यान सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे शेरे गावावर आणि परिसरात प्रचंड शोककळा पसरली असून, स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांवर वाढणारा ताण आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
