आईच्या मांडीवर जेवताना पायाला काहीतरी चावलं, दूर्लक्ष केलं पण नंतर सारेच धास्तावले, 4 वर्षीय चिमुकलीचा हाकनाक जीव गेला
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात सर्पदंशाचा धोका जास्त असल्याचे वेळोवेळी सांगितले जात असले तरी योग्य उपाययोजना आणि तत्काळ आरोग्य सेवा न मिळाल्याने एका निष्पाप जीवाला आपला प्राण गमवावा लागला.

Satara: गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जवळपास निम्मे राज्य पूरग्रस्त परिस्थितीत आहे . अनेक गावांना पुराने वेढा घातला आहे . अनेक शेतांमध्ये पाणी घुसलंय . अशातच अनेक सर्पदंशाच्या घटना समोर येत आहेत . सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात गुरुवारी सकाळी केळघर गावातील श्रीशा मिलिंद घाडगे ही चार वर्षांची चिमुकली सर्पदंशाची बळी ठरलीय. (snake bite)
पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात सर्पदंशाचा धोका जास्त असल्याचे वेळोवेळी सांगितले जात असले तरी योग्य उपाययोजना आणि तत्काळ आरोग्य सेवा न मिळाल्याने एका निष्पाप जीवाला आपला प्राण गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. श्रीशा आईच्या मांडीवर बसून जेवत होती. त्याचवेळी तिच्या पायाला काहीतरी चावल्यामुळे ती किंचाळली. आईला तेव्हा उंदीर असेल असं वाटलं आणि त्या ओरडण्याकडे तिने फारसं लक्ष दिलं नाही. पण काही क्षणांनी घरातील बिळातून साप बाहेर येताना दिसला आणि कुटुंबीयांच्या धास्तीचं कारण स्पष्ट झालं. घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलीला तातडीने उपचारासाठी नेलं.
आरोग्य केंद्राचा निष्काळाचीपणा, ग्रामस्थांचा आरोप
श्रीशाला प्रथम केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे योग्य उपचारच झाले नाहीत. एवढंच नव्हे तर आरोग्य केंद्रात दोन रुग्णवाहिका असूनही त्या उपलब्ध करून दिल्या नाहीत, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी कुटुंबीयांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागला. त्यांनी श्रीशाला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं, परंतु तेथे पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेनंतर गावकरी संतप्त झाले आहेत. आरोग्य केंद्राच्या निष्काळजीपणामुळेच लहानग्या मुलीचा जीव गेला, असा आरोप करत ग्रामस्थांनी केळघर येथे ठिय्या आंदोलन छेडलं. त्यांनी जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तपास सुरू केल्याचं कळतं.
जावळी तालुका हा अति पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसात सापांचे प्रमाण वाढते आणि ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना वाढतात. परंतु अशा प्रसंगी योग्य आरोग्य सेवा तातडीने मिळणं गरजेचं असताना, आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळे एका निरागस जीवाला प्राण गमवावा लागला. असा आरोप गावकरी करतायत .
Heavy Rain Crop Damage | साताऱ्यात Soybean चे मोठे नुकसान, बळीराजाला अश्रू अनावर























