Sangli News: 'स्पेशल 26' चित्रपटासारखा हुबेहुब प्रकार सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात घडला. कवठेमहांकाळमध्ये डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये काल (15 सप्टेंबर) रात्री तीन पुरुष व एका महिलेने आयकर अधिकारी असल्याचे सांगत धाड टाकली. यावेळी चौघांनी ओळखपत्र दाखवत झडती घेण्याबाबत सर्च वॉरंट असल्याचे दाखवले. त्यानंतर घरात सर्वत्र शोधाशोध केली. यावेळी घरातील सर्व रोकड आणि सोने असा कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. संशयितांनी पलायन केल्यानंतर डॉ. म्हेत्रे यांनी या छाप्याबाबत चौकशी केली. त्यावेळी हा छापा बनावट असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांचा फौजफाटा सध्या घटनास्थळी दाखल झाला. या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटे कोणत्या मार्गावर गेले याचा शोध देखील आता घेतला जात आहे. परंतु, स्पेशल 26 या सिनेमा सारखा प्रकार कवठेमहांकाळमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. 

दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक 

दरम्यान, 16 महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनुजा अभिजित पवार (वय 42, रा. शिवशक्ती कॉलनी, जयसिंगपूर) या महिलेची 10 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीमधील संशयित उमेश जगन्नाथ जोशी, अस्मिता जोशी, संतोष सुधाकर पाठक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अनुजा पवार आणि संशयितांची ओळख होती. त्यांना विश्वासात घेऊन कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून अनुजा पवार यांनी त्यांच्याकडील 10 लाख 16 महिन्यांसाठी संशयितांकडे गुंतवले होते. फसवणुकीचा प्रकार 15 सप्टेंबर 2022 ते दि. 11 सप्टेंबर 2025 या कालावधीत घडला. पैसे गुंतवूनही त्यांना 16 महिन्यांत दामदुप्पट रक्कम न मिळाल्याने अनुजा पवार यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानंतर त्यांनी वारंवार संशयितांकडे पाठपुरावा करून पैशाची मागणी केली; परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने अनुजा पवार यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

इतर महत्वाच्या बातम्या