सांगली: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरोध आणि टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Mahamarg) विरोध करण्यासाठी काल (मंगळवारी, ता ९) कोल्हापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी काल (मंगळवारी, ता ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) हे सहभागी झाले होते. या मोर्चासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर आज सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी आज पुन्हा पहाटेपासून पोलिस बंदोबस्तामध्ये ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र शेतकऱ्याचा विरोध कायम असल्याचं दिसून येत आहे. काल ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज पहाटे पासून विटा जवळील नागेवाडी भागात ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला. मात्र दुसऱ्या दिवशीही स्थानिक शेतकऱ्यांचा ड्रोन मोजणीला विरोध कायम आहे. यासंबंधी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावरती एक व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहून पोलिसांवरती हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

Raju Shetti :  खाकी वर्दीतील दरोडेखोर 

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, सांगली जिल्ह्यातील विटा-नागेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाचा मोजणी करण्यासाठी रात्री २ वाजल्यापासून पोलिस तैनात करण्यात आले होते. दिवसभर उन्हातान्हात  काबाड कष्ट करून झोपलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अधिसूचना न काढता शक्तीपीठ मार्गाची जमीन मोजण्यासाठी पहाटे दोन -तीन वाजल्यापासून पोलिस त्रास द्यायला सुरवात केले आहेत. सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोषी यांच्या बुडाखाली अमली पदार्थाची विक्री होत आहे. सांगली शहर व मिरज शहर हे अमली पदार्थाच्या विक्रीचे हब म्हणून ओळखले जावू लागले आहे. या सर्व अमली पदार्थ विक्रेत्याकडून हप्ते घेवून राजरोसपणे अमली पदार्थाची विक्री करण्यास परवानगी देवून लाखो कुटूंबे उध्वस्त करत आहेत. या लोकांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत खाकी वर्दीत नाही. जनरल डायरच्या या औलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. पोलिसांनी कितीही जबरदस्तीने मोजणी करण्याचा  प्रयत्न केल्यास तो प्रयत्न शेतकरी हाणून पाडू लागले आहेत.  सांगली जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील , क्रांतिवीर नागनाथ नायकवडी , क्रांतीअग्रणी जी डी लाड यांचा संघर्ष या मातीत आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

Shakti Peeth Route: कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तिपीठ महामार्ग?

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

Continues below advertisement

Shakti Peeth: कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर - अंबाबाई, तुळजापूर - तुळजाभवानी. नांदेड - माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.  

Shakti Peeth: महामार्गासाठी किती जमीन लागणार?

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे  शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.

Kolhapur and Sangli Farmers: शेतकऱ्यांचा  महामार्गाला आक्षेप का?

रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार, अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या-नाले  बुजवले जाणार.शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणार सध्याच्या जमिनी या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. विशेषत: जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमीहीन होऊ शकतो. काही जमिनी या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे.