सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवणाऱ्या पांडुरंग सोमना कळ्ळी (वय 46) या आरोपीला सांगलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाने दोषी ठरवून ही कठोर शिक्षा सुनावली आहे.

पुण्याच्या नसरापूर येथील घटनेनंतर राज्यात चिमुरड्या मुलीच्या अत्याचार प्रकरणात अवघ्या दीड वर्षात जलदगती न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही दुसरी मोठी घटना ठरली आहे. या प्रकरणी सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारची बाजू मांडली.

Sangli Jath case Incident Background : घराबाहेर खेळताना चिमुरडी बेपत्ता 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी ही आपल्या आजीकडे राहत होती. तिची आई कर्नाटकातील मुधोळ येथे माहेरी गेली होती, तर वडील बांधकाम मजुरीसाठी रत्नागिरीत गेले होते. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आले.

Crime Suspect Behaviour : आरोपी शोधमोहिमेत सामील झाला

मुलीच्या घराच्या मागे राहणारा आरोपी पांडुरंग कळ्ळी हा स्वतः गावकऱ्यांसोबत मुलीच्या शोधमोहिमेत सामील झाला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पीडितेचा मृतदेह आपल्या घरातील लोखंडी पेटीत प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवल्याचे उघडकीस आले.

Investigation Charge Sheet : 15 दिवसांत दाखल केले दोषारोपपत्र

या क्रूर घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड संतापाची लाट पसरली होती. आरोपीला कठोर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी मोर्चे आणि आंदोलने केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते.

Court Verdict : विशेष न्यायालयाचा मरेपर्यंत फाशीचा निर्णय

सुनावणीदरम्यान सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी आरोपीचा जुना गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड न्यायालयात मांडत, अशा नराधमाला समाजाच्या हितासाठी फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे सांगत जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पांडुरंग सोमना कळ्ळी याला दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे पीडित कुटुंबासह नागरिकांनी स्वागत केले आहे.

ही बातमी वाचा: