मिरज (सांगली): घरातील 'गुप्तधन' काढून देण्याचे आणि मुलाची 'भूतबाधा' उतरवण्याचे आमिष दाखवून (Miraj Crime News) एका महिलेची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत सीताराम भुजिंगे (वय ३३, रा. पसरीचा नगर, कोल्हापूर; मूळ गाव - हलसवडे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. (Miraj Crime News)

Continues below advertisement

Miraj Crime News: असा घातला गंडा

मिरजेतील ब्राह्मणपुरी भागातील एका महिलेचा मुलगा गतिमंद आहे. हीच संधी साधून संशयित आरोपी शशिकांत भुजिंगे याने १७ एप्रिल २०२५ रोजी संबंधित महिलेच्या घरी जाऊन "तुमच्या मुलाला भूतबाधा झाली आहे," असे भासवले. आपल्याकडे अघोरी दैवी शक्ती असून घरातील पीडा दूर करून सुख-समृद्धी आणतो, असे सांगून त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला.(Miraj Crime News)

Miraj Crime News: अघोरी विधी आणि खोटे सोने

भोंदूबाबाने केवळ मिरजेतच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी आणि नेर्ले येथील माळरानावर या महिलेला व तिच्या नातेवाईकांना नेऊन 'अघोरी विधी' केले. घरातील गुप्तधन काढून देतो, असे सांगून त्याने या महिलेला विश्वासात घेतले आणि तिला खोटे सोने दिले. या मोबदल्यात त्याने फिर्यादी महिलेकडून ३ लाख २२ हजार रुपये रोख आणि ऑनलाइन स्वरूपात उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने मिरज शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.(Miraj Crime News)

Continues below advertisement

Miraj Crime News: पोलिसांची तत्पर कारवाई; चारचाकी जप्त

गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित शशिकांत भुजिंगे याला कोल्हापुरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली त्याची चारचाकी गाडीही जप्त केली आहे.

ही धडक कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, स्वप्नील नायकोडे, अर्चना आलदर, झाकीर हुसेन काझी, राजेश गवळी, दीपक परीट आणि श्रीकांत केंगार यांचा समावेश होता.

नेमकं प्रकरण काय?

मिरजेत भूतबाधा व घरातील गुप्तधन काढण्याचे आमिष दाखवून महिलेस खोटे सोने देऊन साडेतीन लाखाला गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. शशिकांत सीताराम भुजिंगे (वय 33 रा पसरीचा नगर कोल्हापूर मूळ गाव हलसवडे )असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील फिर्यादी महिलेच्या घरी 17 एप्रिल 2025 रोजी शशिकांत भुजिंगे हा आला होता. फिर्यादी महिलेचा मुलगा हा गतिमंद असल्याने त्यांच्या मुलास भूतबाधा झाली आहे, असे सांगून संशयित भोंदूबाबा शशिकांत भुजिंगे याच्या अंगात अघोरी दैवी शक्ती असल्याचे सांगून घरात सुख समृद्धी आणतो तुमच्या मुलास भूतबाधा झालेली आहे. त्याला बरा करून तुमच्या घरातील गुप्तधन बाहेर काढतो. असे आमिष दाखवून अंधश्रद्धा निर्माण करून सदर महिलेचा विश्वास संपादन करून मिरजेतील फिर्यादी महिलेच्या घरी व कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी व नेर्ले येथे माळरानावर फिर्यादी महिला व तिच्या नातेवाईकांना नेऊन अघोरी विधी केला.