Sangli ZP Election: सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) भाजपला धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या उमेदवार संगीता पाटील या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांचा पराभव केला. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला आहे. मिशन लोटसला चकवा देत सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्ता राखली आहे. मतदानात संगीता पाटील यांना 34 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात असलेल्या स्वप्नाली मासाळ यांना 24 मते मिळाली. या विजयासाठी आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आखलेली रणनीती अतिशय यशस्वी ठरली.
उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड विजयी
उपाध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीतही महाविकास आघाडीने बाजी मारली. ऋषिकेश लाड यांनी भाजप-युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव केला. लाड यांना 34 मते, तर जाधव यांना केवळ 25 मते मिळाली. ऋषिकेश लाड काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे आहेत.
शिंदे सेनेच्या सदस्यांची गैरहजेरी
आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे दोन सदस्य, जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हे मतदानाला गैरहजर राहिले. हे दोन सदस्य भाजप-युतीसाठी महत्त्वाचे मानले जात होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीचे गणित बिघडले आणि महाविकास आघाडीचा विजय सुकर झाला. मतदानाच्या एक दिवस आधीच सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती, ज्यामध्ये अध्यक्ष-उपाध्यक्षांची नावे आणि मतदानाची रणनीती निश्चित करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
