Janabasavananda Swamiji: हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म असे लिंगायत बांधवांनी नमूद करावे असे आवाहन बंगळूर धमपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. हिंदू धर्म लिहू नका कारण हिंदू एक धर्मच नाही, वैदिक धर्माला, सनातन धर्माला हिंदू म्हटलं जातं म्हणून हिंदू हा धर्म नाही असे जनबसवनंद स्वामीजी यांनी म्हटलं आहे.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता गेली

जनबसवनंद स्वामीजी म्हणाले की, भारतात मान्यता मिळालेले जैन, बौद्ध आणि सिख हे तीन धर्म आहेत. ब्रिटिशांच्या काळात लिंगायत धर्माला मान्यता होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता गेली. त्यामुळे लिंगात धर्माला सार्वजनिक मान्यता मिळावी यासाठी जनगणनेमध्ये हिंदू लिंगायत न लिहिता फक्त लिंगायत असे लिहावे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे जसा भारतात जन्मलेल्या जैन, शीख आणि बौद्ध धर्माला मान्यता आहे. तशीच मान्यता लिंगायतला द्यावी. यासाठी जनजागृती यात्रा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काढणार आहोत. 2 जूनपासून मंगळवेढा ते मुंबईपर्यंत ही जनजागृती यात्रा निघणार असल्याचे जनबसवनंद स्वामी यांनी सांगितले.

जनबसवनंद स्वामीजी यांनी वक्तव्य मागे घ्यावे

दरम्यान, जनबसवनंद स्वामीजी यांनी केलेलं वक्तव्य मागे घ्यावे, असे श्रीकाळाराम मंदिर पुजारी सुधीरदास महंत यांनी म्हटलं आहे. हिंदू असणे हा केवळ एक धर्म नाही, तर एक राष्ट्रीय आणि वांशिक सांस्कृतिक ओळख असल्याचे श्रीकाळाराम मंदिर पुजारी सुधीरदास महंत यांनी म्हटलं आहे. सर्वसमावेशक तत्व या भूमीमधून उगम पावलेलं सनातन वैदिक त्याचप्रमाणे बौद्ध जैन शीख इत्यादी सर्व धर्म संस्कृती व्याख्यांमध्ये हे सामावतात, असे ते म्हणाले. पितृभूमी आणि पुण्यभूमी ही ज्यांच्या पूर्वजांची भूमी आहे हे सारेच या ठिकाणी हिंदू आहेत अशी व्याख्या त्या ठिकाणी असल्याचे ते म्हणाले.  

हिंदू असणे हा केवळ एक धर्म नाही, तर..

सुधीरदास महंत म्हणाले, लिंगायत समाज हा हिंदू धर्म आणि सनातानी विचाराने पूजा पाठ करतात.महाराजांनी केलेल्या वक्तव्य, व्याख्या हे पुन्हा बघून त्यांनी मागे घ्यावे. सांप्रदायिक वेगवेगळे धर्म जर अशी मागणी करू लागले, भारताच्या धार्मिक फोल्ड दुभाजला जाईल. जनबसवनंद स्वामी यांनी हिंदू धर्माची व्याख्या समजून घ्यावी अशी विनंती असल्याचे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या