Raju Shetti on Shaktipeeth: शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. खासदार राजू शेट्टी ही या मोर्चामध्ये उपस्थित होते. विटा तहसील कार्यालयामध्ये जात मोर्चेकरांनी ठिय्या मांडला. पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय असा राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना सवाल केला. यानंतर प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोणपे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले.
पोलीस बळाचा वापर करून ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न
विटाजवळील भाग्यनगर, नागेवाडीसह अनेक गावांमध्ये पोलीस बळाचा वापर करून सलग दोन दिवस शक्तिपीठ महामार्गाचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला. हे ड्रोन सर्वेक्षण करण्यास त्या त्या गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे सर्वेक्षण थांबवण्यात आले .यादरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी झटापट देखील झाली. या निषेधार्थ आज विटा जवळील भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला.
खाकी वर्दीतील दरोडेखोर, जनरल डायरच्या औलादी
दरम्यान, आज सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी आज पुन्हा पहाटेपासून पोलिस बंदोबस्तामध्ये ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला आहे. मात्र शेतकऱ्याचा विरोध कायम असल्याचं दिसून येत आहे. काल ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज पहाटे पासून विटा जवळील नागेवाडी भागात ड्रोन मोजणीचा प्रयत्न झाला. मात्र दुसऱ्या दिवशीही स्थानिक शेतकऱ्यांचा ड्रोन मोजणीला विरोध कायम आहे. यासंबंधी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहून पोलिसांवर हल्लाबोल केला. राजू शेट्टी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील विटा-नागेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाचा मोजणी करण्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून पोलिस तैनात करण्यात आले होते. दिवसभर उन्हातान्हात काबाड कष्ट करून झोपलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अधिसूचना न काढता शक्तीपीठ मार्गाची जमीन मोजण्यासाठी पहाटे दोन -तीन वाजल्यापासून पोलिस त्रास द्यायला सुरवात केले आहेत.
एसपी तुषार दोषी यांच्या बुडाखाली अमली पदार्थाची विक्री
सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोषी यांच्या बुडाखाली अमली पदार्थाची विक्री होत आहे. सांगली शहर व मिरज शहर हे अमली पदार्थाच्या विक्रीचे हब म्हणून ओळखले जावू लागले आहे. या सर्व अमली पदार्थ विक्रेत्याकडून हप्ते घेवून राजरोसपणे अमली पदार्थाची विक्री करण्यास परवानगी देवून लाखो कुटूंबे उध्वस्त करत आहेत. या लोकांवर कारवाई करण्याची हिम्मत खाकी वर्दीत नाही. जनरल डायरच्या या औलादी शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. पोलिसांनी कितीही जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न शेतकरी हाणून पाडू लागले आहेत. सांगली जिल्हा हा क्रांतिकारी जिल्हा आहे. क्रांतीसिंह नाना पाटील , क्रांतिवीर नागनाथ नायकवडी , क्रांतीअग्रणी जी डी लाड यांचा संघर्ष या मातीत आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षात ठेवावे, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
