Govind Pansare and Sameer Gaikwad: कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी समीर गायकवाड (Sameer Gaikwad) याचा आज (दि. 20 जानेवारी) सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

समीर गायकवाड हा गेल्या चार वर्षांपासून पानसरे हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर होता. जामीन मिळाल्यानंतर तो सांगलीतील विकास चौक परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. समीर गायकवाडच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी धडकताच कुटुंबावर शोककळा पसरली.

Govind Pansare Murder Case : पानसरे हत्या प्रकरण नेमके काय? 

कॉम्रेड गोविंद पानसरे हे ज्येष्ठ डाव्या विचारांचे नेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकहून परतत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर त्यांची पत्नी उमाताई पानसरे देखील जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना एसआयटीनं अटक केली होती.

मात्र, एसआयटीच्या तपासावर पानसरे कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसंच, या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार, 2022 मध्ये उच्च न्यायालयानं हा तपास एटीएसकडे सोपविला होता. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 9 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर सत्र न्यायालयानं दहा संशयितांवर हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी आरोप निश्चित केले होते. यामध्ये समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह अमोल काळे, सचिन आंदुरे, वासुदेव सूर्यवंशी, अमित डेगवेकर, गणेश मिस्कीन, अमित बद्दी, शरद कळसकर, भरत कुरणे यांचा समावेश होता. या हत्या प्रकरणातील सर्वच 12 संशयीतांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nanded Election Result 2026: ‘तुझा संतोष देशमुखांसारखा गेम वाजवतो’; नांदेडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाला विजयाचा उन्माद, पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत दिल्या धमक्या

Govind Pansare :मोठी बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींना जामीन; सनातन संस्थेची पहिली प्रतिक्रिया