Sangli News : महाराष्ट्रामध्ये सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण आणि वादंग अनेक ठिकाणी सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये देखील महाराजांचा पुतळा बसवण्याच्या श्रेयवादावरून राजकारण सुरु आहे. सध्या या पुतळ्याच्या श्रेयवादामुळे जत शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं आहे. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त सध्या जत शहरातील पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या परिसरात तैनात केला आहे. जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे या पुतळा समितीचे अध्यक्ष आहेत. तर जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना या पुतळा समितीत स्थान दिलं गेलं नाही. आमदारांमुळे पुतळा बसवण्यास प्रशासन विनाकारण परवानगी अट घालत, आडकाठी करत असल्याचा आरोप जगताप करत आहेत. यामुळे सध्या जत तालुक्यातील वातावरण तंग आहे.
जतमध्ये जमावबंदी आदेश लागू करत जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीच बऱ्याच वादानंतर सांगलीहुन हा पुतळा जतमध्ये नेण्यात आला होता. पण पुतळा बसवण्यास प्रशासनानं परवानगी दिली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतरावर उभा करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. मात्र पुतळा समितीनं जुन्या ठिकाणीच पुतळा बसविण्यात येणार असून जीर्णोद्धार करत असल्यानं परवानगीची आवश्यकता नाही असा दावा केला आहे. यामुळे जतमधील वातावरण तणावपूर्ण बनलं असून काल सायंकाळी पोलिसांचे शहरातून संचलन केलं. संभाजी भिडे यांनीसुद्धा जाऊन काल जतमध्ये जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेत पुतळा समितीच्या सदस्यांची आणि आमदार विक्रम सावंत यांची भेट घेतली आणि मध्यस्थी करत पुतळ्यावरून सुरू असलेल्या श्रेयवादाचं राजकारण थांबवण्याच सावंत आणि जगताप यांना आवाहन केलं आहे.
जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 1962 साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु सोळा वर्षांपुर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतऱ्यास तडा गेल्यानं हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणं आणि जिर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते आणि शिवप्रेमींनी घेतला होता. हा पुतळा तयार झाल्यानं तो यावर्षीच्या शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) बसवण्यात यावा अशी लोकभावना आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला.
पण सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही असा आदेश दिला गेला. त्यानंतर विलासराव जगताप यांनी प्रशासन आणि आमदार विक्रम सावंत यांना लक्ष्य करत ही मंडळी पुतळा बसवण्यास आडकाठी घालत असल्याचा आरोप केला. त्यामुळं पुन्हा वातावरण तापलं आहे. यातच शिवजयंती देखील तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराला छावणीचं स्वरूप आलं आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केले आहेत. शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, बाजारपेठ प्रमुख रस्ते, जगताप पेट्रोल पंप आदी प्रमुख ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे आणि शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
प्रशासन म्हणतं, पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा
थोर महापुरूष, महनिय व्यक्ती यांचे पुतळे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणं आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाने नियमावली ठरविली आहे. तसेच पुतळा बसविण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सन 2017 पासून स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेले आहेत. पुतळे स्थापन करताना राष्ट्र पुरूषांचा योग्य सन्मान राखला जावा यासाठी पुतळा समितीने न्यायालय व शासनाने दिलेल्या मागदर्शक नियमांची व विविध परवानग्यांची पूर्तता करावी. जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी पुतळा समितीनं सर्व परवानग्यांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केलं.
संभाजी भिडेंकडून आमदार विक्रम सावंत-विलासराव जगताप यांची भेट
संभाजीराव भिडे यांनी काल जतमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेत आमदार विक्रम सावंत आणि विलासराव जगताप या दोघांची भेट घेतली. या भेटीत भिडे यांनी सावंत आणि जगताप या दोघांनाही पुतळ्यावरून वाद मिटवत एकत्र येत पुतळा उभारणी करावी, असं आवाहन करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोहचवू असं देखील आश्वासन भिडे यांनी दिलं असल्याचं विलासराव जगताप यांनी सांगितलं आहे. मात्र विक्रम सावंत आणि विलासराव जगताप हे दोघेही आपापल्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचं कळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे आज शब्द सत्यात उतरवणार, बैलगाड्या समोर घोडीवर बसणार
- Nana Patole : नाना पटोले म्हणतात, 10 मार्चनंतर सरकारमध्ये फेरबदल करणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha