Continues below advertisement


रत्नागिरी : ऐन गणेशउत्सवच्या काळात कोकणात बॅनर वॉर रंगल्यामुळे राजकीय शिमगा सुरु झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे महायुतीतील मंत्री असलेल्या कोकणातील लोकप्रतिनिधीनी केलेली टीका आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर लावलेलं बॅनर. अर्थात या वादामागील कारण काय? कोकणातील महायुतीत सुरु असलेल्या अंतर्गत धुसफूसचा अर्थ काय? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.


कोकणातील रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील सलग पाच वेळा आमदार राहिलेले आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात नितेश राणेंचे एक बॅनर लागले आहे. महायुतीत एकत्र असलेले हे दोन्ही मित्र आता मात्र एकमेकांच्या विरोधात उघडपणे टीका टिपणी करतात. त्यामागे मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा.


याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेले विधान नितेश राणे यांना उद्देशून असल्याची चर्चा रंगली आणि त्यानंतर ऐन गौरी गणपतीच्या काळात रत्नागिरीमध्ये बॅनर लागले.


जुना वाद कारणीभूत


अर्थात हा वाद काही या पत्रकार परिषदेपासून सुरू झाला नाही. त्यामध्ये काही महिन्यांपूर्वीचा इतिहास आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील वरची पेठ येथे एक इमारत आहे. त्या इमारतीमध्ये मुस्लिम समाज आपले ताबूत ठेवतात. मुस्लिम समाज त्या ठिकाणी सण साजरा करतात. मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी सूर्य मंदिर असल्याचा दावा केला आहे.


या दाव्याच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी, म्हणजे 22 ऑगस्ट 2025 रोजी राजापूरमध्ये नितेश राणे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एका सभेचे आयोजन केले होते. पण, या सभेला नितेश राणे हे गैरहजर राहिले. मात्र नाणीजचे नरेंद्र महाराज या बैठकीला गेले होते. या बैठकीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे उदय सामंत यांनी नाव न घेता नितेश राणे यांना पत्रकार परिषदेत टोला लगावला होता.


त्यानंतर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत. अर्थात, या आरोप प्रत्यारोपांच मूळ हिंदुत्वाशी दिसत असले तरी त्यामध्ये काही राजकीय उद्देश, आजच्या आणि उद्याच्या राजकारणाचा देखील संबंध आहे.


राजकीय वर्चस्व कुणाचं?


सध्या कोकणात शिवसेना अर्थात शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी पक्ष बळकटीवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. त्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा देखील समावेश आहे. त्यात कोकणात मिळणारे पाठबळ हे मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या महानगरांमधील राजकारणवर देखील परिणामकारक ठरते. त्यामुळे मुद्दा हिंदुत्वाचा असला तरी राजकीय वर्चस्व आणि ताकद कोणाची? यावरून सुरू असलेलेराजकीय द्वंद्व म्हणून देखील या सर्व प्रकरणाकडे पाहता येईल.