Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. रत्नागिरीच्या जगबुडी नदीवरील पुलावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यावेळी कार जगबुडी नदीच्या पुलावरुन 100 ते 150 फूट खाली कोसळली. त्यामुळे कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातामध्ये मुंबईहून देवरुखला जात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण देवरुखला एका अंत्यविधीसाठी जात होते. त्यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृतांमध्ये मेधा परमेश पराडकर , सौरभ परमेश पराडकर (22), मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19) , श्रेयस राजेंद्र सावंत (23) यांचा समावेश आहे. तर गाडीचा चालक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर कळंबणी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jagbudi River Accident: मीरा-भाईंदरवरुन मोरे आणि पराडकर कुटुंबीय कोकणात निघाले पण वाटेतच घात झाला
या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण मीरा-भाईंदर आणि नालासोपाऱ्यातील रहिवासी होते. सावंत पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत, तर मोरे मिरा-भाईंदर येथील आहेत. हे सर्वजण रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या गावी देवरुखला जाण्यासाठी निघाले होते. किया कार क्रमांक MH 02 3265 या वाहनाने ते प्रवास करत होते. मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका हे गाव ओलांडल्यानंतर त्यांची कार जगबुडी नदीच्या मोठ्या पुलावर आली. यावेळी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पुलाच्या दुभाजकाच्या मधील जागेतून कार नदीपात्रात कोसळली. कार 100 ते 150 फूट खाली कोसळल्याने जोरात आदळली. त्यामुळे कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गाडीतील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले.
Bhandara Accident: भंडाऱ्यात भरधाव टिप्परच्या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी
सायकलनं खासगी शिकवणीला जाणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीला पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परनं जबर धडक दिली. या अपघातात सायकलचा चुराडा झाला. तर, विद्यार्थिनी दूर फेकली गेल्यानं तिला गंभीर इजा झाली. या घटनेनंतर संतप्त ग्रामवासियांनी रास्तारोको करीत अपघातास कारणीभूत असलेल्या टिप्परची तोडफोड करून संताप व्यक्त केला. वरठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून टिप्पर आणि चालक ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. संतप्त नागरिकांची समजूत घालत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. ही घटना भंडारा - वरठी मार्गावरील दाभा वळणावर घडली. लीनता साठवणे (१४) असं जखमी विद्यार्थिनीचं नाव असून तिच्यावर भंडाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा
खेडमध्ये जगबुडी नदीच्या पुलावर अपघात, कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू