Ratnagiri Bauxite Mining Project: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) या प्रकल्पाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली असून, कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

Continues below advertisement

Ratnagiri Bauxite Mining Project: पर्यावरणाचा समतोल धोक्यात?

सुमारे 144.95 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प प्रस्तावित असून, दरवर्षी 0.9 दशलक्ष टन बॉक्साईट उत्खनन करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे कोकणची भूजल पातळी घटणे, जैवविविधतेचा ऱ्हास होणे आणि धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः या प्रकल्पामुळे आंबा आणि काजू बागायतींचे मोठे नुकसान होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेवर घाला घातला जाईल, असा दावा शिवसेनेने केला आहे.

Ratnagiri Bauxite Mining Project: प्रकल्पाविरोधातील ठाकरे गटाची भूमिका

बागायती व स्थानिक अर्थव्यवस्थेवर घाला : आंबा व काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.

Continues below advertisement

भूजल पातळी घट व जलसंकट : उत्खननामुळे नैसर्गिक जलस्रोत बाधित होऊन पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पर्यावरणीय ऱ्हास : वनक्षेत्र, मृदा धूप, धूळ प्रदूषण आणि जैवविविधतेचे नुकसान यामुळे कोकणचा निसर्ग धोक्यात येईल.

आरोग्यावर गंभीर परिणाम : उत्खननातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.

भूस्खलन व आपत्तीचा धोका : कोकणातील डोंगराळ व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे भूस्खलन व नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वीकृतीचा अभाव : ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध असताना प्रकल्प पुढे रेटणे ही लोकशाही प्रक्रियेची पायमल्ली आहे.

Ratnagiri Bauxite Mining Project: जनसुनावणी उधळून लावण्याचा इशारा

येत्या 20 मे 2026 रोजी या प्रकल्पा संदर्भात प्रस्तावित असलेली जनसुनावणी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर प्रशासनाने ही सुनावणी रेटण्याचा प्रयत्न केला, तर स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसैनिकांच्या जोरावर ही सुनावणी उधळून लावली जाईल, असा स्पष्ट इशारा रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस आणि तालुका प्रमुख कमलाकर कदम यांनी दिला आहे.

Ratnagiri Bauxite Mining Project: रिफायनरीच्या लढ्याची पुनरावृत्ती?

कोकणातील रिफायनरी प्रकल्पाविरोधात ज्याप्रमाणे शिवसेनेने प्रखर लढा देऊन तो प्रकल्प मागे घेण्यास शासनाला भाग पाडले होते, त्याच धर्तीवर आता बॉक्साईट प्रकल्पाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे. "कोणत्याही परिस्थितीत कोकणच्या निसर्गाचा आणि जनतेच्या हक्कांचा बळी देणारा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही," असेही पदाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.

आणखी वाचा 

Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप