रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी केंद्र सरकारने करावी अशी मागमी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केली. विमान धावपट्टीवर न येता ते तिरकं झालं, पायलटला नेमकी काय अडचण होती हे समोर येणं आवश्यक आहे. विमान अपघातासंबंधी सगळ्या गोष्टी समोर याव्यात, अन्यथा विमान प्रवास हा सुरक्षित नाही असा समज होण्याची शक्यता असल्याचं रामदास कदम म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना रामदास कदमांनी ही मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचा विमान अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. या अपघाताची केंद्र सरकारने चौकशी सुरू केली आहे. आता तशीच मागणी रामदास कदमांनी केली आहे. 

विमान तिरकं का झालं?

रामदास कदम म्हणाले की, "अजित पवार राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री होते. आणि जेव्हा अशा उपमुख्यमंत्री यांच्या विमानाचा अपघात होतो तेव्हा त्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. त्या अपघाताचे फुटेज पाहिलं तर, लँडिंग होताना ते विमान धावपट्टीवर न येता तिरके झाल्याचं दिसतंय. ते विमान धावपट्टीवर आलं नाही, त्याचा आवाज वेगळा येत होता. मग नेमकं पायलटला अडचण काय होती? याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे."

याबाबत चौकशी होऊन सत्य समोर आलं नाही तर विमान असुरक्षिततेच साधन आहे असा समज होईल. यात अधिक स्पष्टता यायला पाहिजे. अन्यथा यापुढे कोणता मंत्री विमानाने प्रवास करणार नाही अशी स्थिती होईल असं रामदास कदम म्हणाले. 

केंद्र सरकारकडून चौकशी सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भीषण विमान अपघात प्रकरणात एअरक्राफ्ट अॅक्सिडन्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं चौकशी सुरु केली असल्याचं उत्तर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला दिलं आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सही ताब्यात घेण्यात आला असल्याचं त्यांनी कळवलं आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळं घडला आणि त्याच्या कारणांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीसांनी पत्रातून केली होती.

या विमान अपघाताची चौकशी पारदर्शी आणि आमचं उत्तरदायित्व लक्षात घेऊन करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी पत्रात दिलं आहे. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचंही सहकार्य आमच्यासाठी मोलाचं ठरावं. त्यासाठी स्थानिक प्रशासनाची आम्हाला मदत लागेल. त्यामुळं या अपघाताची चौकशी पूर्ण होताच, आम्ही तो अहवाल महाराष्ट्र सरकारलाही देऊ, असंही आश्वासन राममोहन नायडू यांनी फडणवीसांना दिलं आहे. 

ही बातमी वाचा: