Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघांचा अपघात, निवृत्त प्राध्यापकांसह 3 जणांचा दुर्दैवी अंत
Nashik Accident : महाकुंभमेळ्याला गेलेल्या रत्नागिरीतील तिघांचा अपघात, निवृत्त प्राध्यापकांसह 3 जणांचा दुर्दैवी अंत

Nashik Accident : कोकणात रत्नागिरी (Ratnagiri) येथून महाकुंभमेळ्याला (Mahakumbh Mela) गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. नाशिक (Nashik) जवळ सिन्नर (Sinnar) येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी (Ratnagiri) डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे. याशिवाय चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम यांचाही मृत्यू झालाय.
अधिकची माहिती अशी की, एकूण सातजण महाकुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून गेले होते. दरम्यान, परतत असताना नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने सावंत देसाई,निकम व झगडे कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी होते. महाकुंभमेळ्यासाठी गेलेले यातील काहीजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.
रत्नागिरी माळ नाका येथील येथील डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे 7 जण प्रवास करीत होते. यापैकी तीन जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. किरण निकम यांची प्रकृती गंभीर आहे तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व श्री. प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातात आणखी तिघे जखमी झाले. या हादरवून सोडणाऱ्या अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई , वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ पहाटे 4 वा. झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या इनोव्हा गाडीचा चक्काचुर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप करू शकले नाही. मात्र सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान सोहळ्यानंतर इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली दरम्यान हा सगळा गंभीर अपघात झाल्याचे कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई हे समाजकारणात सक्रिय होते. मराठा महासंघाचे ते सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते होते. अलीकडेच हॉटेल विवेक येथे झालेल्या मराठा महासंघाने कार्यक्रमातही त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता. सावंत देसाई यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, सून, जावई असा मोठा परिवार आहे. महाविद्यालयातील निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात रत्नागिरी येथे अग्रेसर होते. तर अक्षय निकम यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ जवळ हॉटेल व्यवसाय आहे तेही सामाजिक कार्यात सक्रिय होते. तर भगवान उर्फ बाबू झगडे हा चालक रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध होता. चालक बाबू झगडे यांच्या पश्चात पत्नी,मुलं असा परिवार आहे. बाबू झगडे हे मूळचे रत्नागिरी जवळ खेडशी येथील आहेत. अपघातामुळे रत्नागिरी येथे शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























