रत्नागिरीमधील खेडमध्ये भाजपचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर (Vaibhavi Khedekar) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. वैभवी खेडेकर यांनी खेडच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम आणि भाजपचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar vs Yogesh Kadam) आमनेसामने येणार आहेत.  

भाजप आणि अपक्ष म्हणून वैभवी खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे खेड नगरपरिषद निवडणुकीत (Khed Nagarparishad Election 2025) युतीमध्येच राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता आहे. भाजपकडून नगरसेवकांच्या 15 जागांसाठी अर्ज भरल्याने खेडमध्ये राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत.  महायुती म्हणून भाजपला केवळ 3 जागा सोडल्यामुळे खेडमध्ये राजकीय नाट्य रंगले होते. त्यामुळे अखेरच्या दिवशी खेड भाजपकडून खेळलेल्या नव्या राजकीय खेळीमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. 

वैभव खेडेकर काय म्हणाले? (Vaibhav Khedekar vs Yogesh Kadam)

वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही 3 जागांवर भाजपकडून अर्ज भरलेत. मात्र जास्त जागांची आमची मागणी पूर्ण होईल, या आशेने इतर ठिकाणी देखील अर्ज भरल्याची सावध प्रतिक्रिया वैभव खेडेकर यांनी दिली आहे.

वैभव खेडेकरांनी योगेश कदमांविरुद्ध फुंकले रणशिंग- (Vaibhav Khedekar Khed)

मनसेतून भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासमोर मंत्री योगेश कदम यांच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचे दिसून आले होते. जिल्ह्यात इथून पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडककेला दिसेल, असा वैभव खेडेकर यांनी रवींद्र चव्हाण यांना शब्द दिला. कोकणात अनेक वर्षांपासून विशिष्ट पक्षाची सत्ता आहे. दुसरा पक्ष पुढे जाऊ नये, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत, असं वैभव खेडेकर म्हणाले होते. माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ नयेत यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले. मात्र तरीही देव आणि नेते माझ्यासोबत होते, असंही वैभव खेडेकर म्हणाले होते. 

मागील 14 वर्षांचा खेड शहराचा वनवास संपवण्याची वेळ- योगेश कदम (Yogesh Kadam On Vaibhav Khedekar)

खेडमध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी महायुतीकडून शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी अर्ज भरला आहे. योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये माधवी बुटाला यांनी अर्ज भरला. यावेळी वैभव खेडेकर अनुपस्थित होते. यादरम्यान, मागील चौदा वर्षांचा खेड शहराचा वनवास संपवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत योगश कदम यांनी नाव न घेता वैभव खेडेकरांना टोला लगावला होता. कोण अंगावर आलं, तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, असंही योगेश कदम म्हणाले होते. 

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान- (Nagarparishad Nagarpanchayat Election 2025)

मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज छाननी नंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असून 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा; ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंसाठी छातीचा कोट करुन उभी राहिली, काँग्रेसला चांगलच सुनावलं!