नवी दिल्ली : मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि कोकणातील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कोकणवासीयांच्या आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधत नितीन गडकरी (Sunil Tatkare) यांना सविस्तर निवेदनाचे पत्र सुपूर्द केले.
Kharpada Toll Dispute : रस्त्याचे काम अपूर्ण असताना टोलवसुली का?
सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी खड्डे आणि अर्धवट कामांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही खारपाडा टोलनाक्यावर सुरू करण्यात आलेली टोलवसुली अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळे महामार्गाचे पूर्ण काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथील टोलवसुली तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली.
Tamhini Ghat Tunnel Project : ताम्हिणी घाटात बोगद्याचा प्रस्ताव
रायगड आणि पुणे या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील गंभीर समस्येकडेही खासदार तटकरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पावसाळ्यात ताम्हिणी घाटात सतत होणारे भूस्खलन, दरडी कोसळण्याच्या घटना आणि त्यामुळे होणारी तासनतास वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी घाटात पर्यायी बोगदा (Tunnel) उभारण्यात यावा, असा प्रस्ताव त्यांनी पत्रात मांडला आहे.
Action For Konkan Travelers : पाठपुरावा सुरूच राहील
या भेटीबाबत सोशल मीडियावरून माहिती देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, "रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील नागरिकांचा आणि चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नितीन गडकरी यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे."
ही बातमी वाचा:
