Raigad :मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी मार्गाची अवस्था अतिशय धोकादायक बनली आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतचा भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी सुरक्षा कठडेही वाहून गेले आहेत. काही ठिकाणी लोखंडी गर्डर हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत असल्याने या मार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे.

Continues below advertisement

प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय

कशेडी बोगद्याला पर्यायी म्हणून वापरला जाणारा हा जुना घाटमार्ग गेल्याच वर्षी डांबरीकरण व नूतनीकरण करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसाच्या तडाख्यात रस्त्याचा भराव वाहून गेल्याने त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पावसाचा जोर आणखी वाढल्यास उर्वरित रस्तादेखील वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना नाहीत

विशेष म्हणजे, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी तातडीने तांत्रिक पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती, सुरक्षा कठड्यांची पुनर्बांधणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Continues below advertisement