Raigad Mumbai Goa Highway : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषत: मुंबईसह कोकणमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील 8 तासांपासून ठप्प झाली आहे. अनेक वाहने पूर परिस्थितीमुळे मुंबई गोवा महामार्गावर अडकली आहेत. अडकलेल्या प्रवाशांना प्रमोद म्हसकर सामाजिक संस्थेकडून मदतीचा हात दिला आहे. मुंबई गोवा महामार्गाजवळच्या सुकेळी खिंड परिसरातील जिंदाल कंपनीजवळ साचलेल्या पुराच्या पाण्यामुळे मागील 8 तासांपासून वाहतूक ठप्प पडली आहे. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना प्रमोद म्हसकर सामाजिक संस्थेकडून सध्या मदतीचा हात पुढे करण्यात आला. अनेक वाहनांमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला देखील असल्यामुळे जवळपास कोणतीही खाद्यपदार्थांची सोय नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांचा मदतीकरीता प्रमोद म्हसकर सामाजिक संस्थेकडून मदत पुढे करण्यात आली आहे. शिवाय पोलिस प्रशासन वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याच आवाहन करत आहेत. पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देखील वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून कोकणाकडे येणाऱ्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मुंबई गोवा महामार्गावर जिंदाल कंपनीजवळ साचलेल्या पुराच्या पाण्यामुळे सकाळपासून वाहतूक खोळंबली आहे. अनेक प्रवाशी या मार्गावर अडकून पडल्याने मुसळधार पावसाचा मोठा त्रास या प्रवाशांना सहन करावा लागतोय. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक आणखी काही तास बंद राहण्याची शक्यता आहे. कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून कोकणाकडे येणाऱ्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प पडल्याने वाहनांच्या रांगा च रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या पावसाचा मोठा दणका शहारतील नागरिकांना बसला आहे. पावसामुळं शहरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अनंत आईस फॅक्टरी, मच्छी मार्केट परिसरात गटारे तुंबल्यामुळं रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नाईक कंपनी परिसरात वाशिष्टी नदीच्या पुराचे पाणी साचले आहे.
पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली
पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंबेनळी घाटात छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. दरड कोसळण्याच्या घटना आणि प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन शासनाने आंबेनळी घाट प्रवासासाठी बंद केला आहे.
चिपळूण–गुहागर मार्गावर पाणी, वाहनचालकांची कसरत
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असून चिपळूण आणि गुहागर मार्गावर मिरजोळी या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.